जिओची ट्रू 5G बीटा ट्रायल दसऱ्याला सुरू होणार

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की, यासोबतच यूजर्सना वेलकम ऑफर देखील मिळेल
जिओची ट्रू 5G बीटा ट्रायल दसऱ्याला सुरू होणार
Published on

रिलायन्स जिओच्या ट्रू-५जी सेवेची बीटा चाचणी दसऱ्यापासून सुरू होत आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी या देशातील चार शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. सध्या, ही सेवा आमंत्रणावर आहे, म्हणजेच विद्यमान जिओ वापरकर्त्यांमधून काही निवडक वापरकर्त्यांना ही सेवा वापरण्यासाठी आमंत्रण पाठवले जाईल.

रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की, यासोबतच यूजर्सना वेलकम ऑफर देखील मिळेल, ज्या अंतर्गत यूजर्सना १Gbps पर्यंत स्पीड आणि अमर्यादित ५जी डेटा मिळेल. आमंत्रित वापरकर्ते जिओ ट्रू ५जी सेवेचा अनुभव घेतील आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित, कंपनी एक सर्वसमावेशक ५जी सेवा सुरू करेल.

वी केअर म्हणजे आम्ही तुमची काळजी घेतो, या मूळ मंत्रावर जिओ चा ट्रू ५जी आधारित आहे. यामुळे शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, कौशल्य विकास, लघु, मध्यम आणि मोठे उद्योग, आय ओ टी, स्मार्ट होम आणि गेमिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये पूर्णपणे परिवर्तन येईल आणि १४० कोटी भारतीयांवर त्याचा थेट परिणाम होईल. रिलायन्स जिओच्या ५जी सेवेचे दर फार जास्त नसतील आणि ते परवडणारे असतील, असे रिलायन्स जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. ५जी नेटवर्क सेवा आक्रमकपणे सुरु केली जाईल. प्रारंभी काही शहरांमध्ये सुरु केली जाणाऱ्या ५जी सेवेचा डिसेंबर २०२३ पर्यंत देशभर विस्तार केला जाईल, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच देशात ५जी सेवेचे उद‌्घाटन केले. रिलायन्स जिओ दिवाळीपूर्वी चार शहरांमध्ये - दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये ५जी सेवा सुरु करणार आहे. तर एअरटेलने नुकतीच ५जी सेवा सुरू केली आहे. मात्र, हे दर परवडणारे असतील, असे आकाश अंबानी यांनी या मुलाखीत सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in