जितेंद्र आव्हाड अण्णा हजारेंचा वाद राजकारणात नवे रंग भरणार!

"बरे झाले,जागे तर झाले!"म्हणत अण्णांना पुन्हा डिवचले
जितेंद्र आव्हाड अण्णा हजारेंचा वाद राजकारणात नवे रंग भरणार!
Published on

मुंबई : काँग्रेस आघाडीचे सरकार असताना दिल्लीत आंदोलने करून त्या सरकारला जेरीस आणून जगभरात आदर्श समाजसेवक म्हणून जगभर गाजलेले पद्मभूषण अण्णा हजारे भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गप्प का आहेत, हा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून चर्चिला जात असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमातून त्यांच्यावर मारलेल्या शेऱ्यांमुळे आव्हाड आणि हजारे यांच्यातील वाद चिघळला आहे. आता हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात नवे रंग भरणार आहे.

"या माणसाने या देशाचे वाटोळे केले, टोपी घातली म्हणून कुणी गांधी होत नाही", असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटरवर केला होता. या आरोपांने पद्मभूषण अण्णा हजारे दुखावलेल्या अण्णांनी प्रसार माध्यमांसमोर " हा कोण आव्हाड? असे उद्वेगाने म्हणत, मी देशाचे वाटोळे कसे केला याचा खुलासा आ. जितेंद्र आव्हाडांनी करावा, असे अण्णा म्हणाले. ते अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या तयारीला लागले आहेत. या विषयी आपण कायदेशीर सल्ला घेत आहोत. तसेच हा दावा कुठून आणि कशा पद्धतीने दाखल करायचा हे आपण लवकरच जाहीर करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. यावर शुक्रवारी आ. जितेद्र आव्हाडांनी "बरे झाले,ते जागे झाले." असे समाज माध्यमात म्हणत पुन्हा डिवचले.

अण्णा हजारे पुन्हा चर्चेत

१९९५-९६ राळेगणसिद्धी हे गाव आणि अण्णा हजारे पहिल्यांदा व्यापक स्वरुपात प्रकाशझोतात आले होते. भाजप -शिवसेनेच्या महाराष्ट्रातील "शिवशाही" सरकार मधील भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात राळेगणसिद्धी येथे त्यांनी केलेले आमरण उपोषण खूप गाजले होते. त्या आंदोलनामुळे काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते. अण्णांवर टीका करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी अण्णांना दिलेले " वाकड्या तोंडाचा गांधी" हे वादग्रस्त संबोधनही देशभर गाजले होते. आता "टोपी" आणि "गांधी" यासंदर्भानेच अण्णा हजारे आणि आ. आव्हाड यांच्यात नवा वाद छेडला गेला आहे. या निमित्ताने दीर्घकाळ प्रसिद्धी झोतात नसलेले हजारे या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत. हा वाद वेगवेगळ्या विषयांमुळे पेटलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवे रंग भरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in