गडकिल्ल्यांच्या सुशोभीकरणासाठी जेजे महाविद्यालयाची मदत घेणार - मुनगंटीवार

सह्याद्री अतिथीगृहात जे.जे. कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजीव मिश्रा यांनी मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली.
गडकिल्ल्यांच्या सुशोभीकरणासाठी जेजे
महाविद्यालयाची मदत घेणार - मुनगंटीवार

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनात सुशोभीकरण हा एक महत्त्वाचा मुद्दा असून याबाबत जेजे कला महाविद्यालयाची मदत घेण्याचा शासन विचार करत असल्याचे रविवार, १८ सप्टेंबर रोजी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात जे.जे. कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजीव मिश्रा यांनी मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली. सिंहगड किल्ल्याच्या सुशोभीकरणात जे.जे. कला महाविद्यालयाचा सहभाग घेण्यावर यावेळी चर्चा झाली. तसेच कांदळवनांच्या कुंपणभींतींचे सुशोभीकरणही जे.जे. कला महाविद्यालयाने करण्याबद्दलही यावेळी चर्चा झाली. सांस्कृतिक खात्याच्या कार्यक्रमांत जे.जे. कला महाविद्यालयाचा कसा सहभाग असू शकतो, यासंदर्भातही यावेळी मंत्रीमहोदयांनी चर्चा केली.

कलाकारांच्या विविध समस्यांसदर्भात वेगाने मार्ग काढू

राज्यातील कलाक्षेत्रात कार्यरत कलाकारांना विविध समस्या भेडसावत असून शासन त्यावर वेगाने मार्ग काढेल, असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सह्याद्री अतिथीगृहात ज्येष्ठ कलाकार वैजयंती कुलकर्णी आपटे, दिग्दर्शक जब्बार पटेल तसेच अभिनेत्री अलका कुबल यांनी मुनगंटीवार यांच्या स्वतंत्र सदिच्छा भेटी घेतल्या. यावेळी विविध विषयांसंदर्भात या कलाकारांसोबत मंत्री महोदयांची चर्चा झाली. या सर्वांनी कलाक्षेत्राच्या विविध समस्यांकडे मंत्रीमहोदयांचे लक्ष वेधले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in