

मुंबई : राज्यातील प्रमुख सरकारी रुग्णालय असलेल्या जे. जे. रुग्णालयात एप्रिल महिन्यात सुरू झालेली रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा रुग्णांसाठी मोठा आधार ठरत आहे. अवघ्या ८३ दिवसांत रुग्णालयाने १०१ रुग्णांवर यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. या शस्त्रक्रिया गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या.
खाजगी रुग्णालयांमध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांचा खर्च साधारण ३ लाख ते ५ लाख रुपयांपर्यंत येतो; परंतु जे. जे. रुग्णालयात या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जात आहेत.
अलीकडच्या काळात भारताने रोबोटिक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. ही आधुनिक तंत्रज्ञान पद्धत अधिक अचूक, कमी वेदनादायक आणि जलद बरे होणारी शस्त्रक्रिया शक्य करते. वैद्यकीय शिक्षण विभागाने जे. जे. रुग्णालयात ही प्रणाली बसवण्याचा निर्णय घेतला आणि सुमारे ३२ कोटी रुपयांच्या खर्चाने ती उभारण्यात आली.
रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले की, रुग्णालयात पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया ९ एप्रिल रोजी करण्यात आली.
खर्च (खासगी रुग्णालयातील अंदाज)
प्रोस्टेटेक्टॉमी किंवा युरोलॉजिकल रोबोटिक शस्त्रक्रिया : २२.५ लाख-२३.५ लाख
हर्निया किंवा पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया : २१.५ लाख-२२.५ लाख
स्त्रीरोगविषयक रोबोटिक शस्त्रक्रिया : २२ लाख-२३ लाख
सध्या सुरू असलेल्या शस्त्रक्रिया
पित्ताशय काढणे (Cholecystectomy)
हर्निया शस्त्रक्रिया
गुंतागुंतीच्या ठिकाणी असलेले ट्यूमर काढणे
लवकरच सुरू होणाऱ्या सेवा
गॅस्ट्रोएंटरोलॉजी
यूरोलॉजी (उदा. प्रोस्टेट, मूत्राशय, मूत्रपिंड शस्त्रक्रिया) स्त्रीरोगशास्त्र
रोबोटिक सहाय्याने झालेल्या शस्त्रक्रिया
डॉ. भंडरवार यांनी सांगितले की, रोबोटिक शस्त्रक्रियेचा फायदा म्हणजे अचूक निदान, कमी रक्तस्त्राव, कमी वेदना आणि जलद बरे होणे. या शस्त्रक्रिया सामान्य शल्यचिकित्सा विभागातील तज्ज्ञांनी केल्या आहेत. आतापर्यंत रोबोटचा वापर पित्ताशय, हर्निया, स्वादुपिंड आणि इतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी झाला आहे. लवकरच याचा वापर यकृत, मूत्रपिंड, मूत्रमार्ग, गर्भाशय आणि स्तन यांच्या शस्त्रक्रियांसाठीही केला जाणार आहे.
पहिल्या ५०० शस्त्रक्रिया मोफत
डॉ. भंडारवार पुढे म्हणाले की, रोबोटिक शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जे. जे. रुग्णालयाने सार्वजनिक आरोग्यसेवेत नवा आदर्श निर्माण केला आहे. पहिल्या ५०० रोबोटिक शस्त्रक्रियांचा खर्च रोबोट पुरवणाऱ्या कंपनीकडून उचलला जाईल. त्यानंतरही या सेवा गरीब रुग्णांना मोफत देण्याचा रुग्णालयाचा मानस आहे आणि यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून निधी मिळवण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांत रोबोटिक शस्त्रक्रियेचा खर्च प्रक्रिया व संस्थेनुसार साधारण दीड लाख ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत असतो.