अमित श्रीवास्तव/मुंबई
मुंबईतील भायखळा येथील सरकारी सर जे. जे.रुग्णालयातील प्रसूती विभागाचे (लेबर वॉर्ड) दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि देणगीदारांच्या मदतीने नूतनीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आले आहे. हे काम नितीन इंदिरा-विष्णू कदम आणि 'टीम ट्रेंड सेटर्स' यांच्या नेतृत्वाखाली झाले.
या सुधारित प्रसूती विभागात आता अत्याधुनिक जीवनरक्षक वैद्यकीय उपकरणे आणि सुधारित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्याचा उद्देश महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या सार्वजनिक रुग्णालयांपैकी एकातील माता आणि नवजात बालकांसाठीच्या आरोग्य सेवा अधिक बळकट करणे हा आहे.
नूतनीकृत विभागाच्या अधिकृत हस्तांतरणापूर्वी, सर जे. जे. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि विभागप्रमुख डॉ. विजय कल्याणकर यांनी नर्सिंग आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पाहणी केली. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबद्दल आणि पूर्णत्वास नेण्यासाठी केलेल्या सामूहिक प्रयत्नांबद्दल अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.