जेएनपीटी-वैतरणा रेल्वे मालवाहतूक प्रकल्प वर्षभरात पूर्ण होणार; मालवाहतूक रेल्वेमार्गाची अधिकाऱ्यांकडून पाहणी

मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्ग उभारण्याचे काम देशभरात वेगाने सुरू आहे. यामध्ये 'वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'ची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाची पाहणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या जेएनपीटी-वैतरणा समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
भारतीय रेल्वे
भारतीय रेल्वे
Published on

मुंबई: मालवाहतुकीसाठी समर्पित रेल्वे मार्ग उभारण्याचे काम देशभरात वेगाने सुरू आहे. यामध्ये 'वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर'ची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाची पाहणी रेल्वे अधिकाऱ्यांनी केली. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या जेएनपीटी-वैतरणा समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.

भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प म्हणून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर (डीएफसी) ओळखला जातो. मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग असलेल्या या प्रकल्पातील जवाहरलाल नेहरू बंदर (जेएनपीटी)- वैतरणा विभाग महत्त्वाचा रेल्वे मार्ग आहे. या प्रकल्पामुळे जवाहरलाल नेहरू बंदरापर्यंत (जेएनपीटी) येथील ट्रक, कंटेनर यांची रस्ते वाहतूक थांबवली जाऊन, रेल्वेमार्गे ही वाहतूक केली जाणार आहे. यामुळे उरण, पनवेल, कळंबोलीसह ट्रक, कंटेनरची वाहतूक करणाऱ्या परिसरातील वर्दळ कमी होणार आहे. त्याचबरोबर प्रदूषणाचे प्रमाणही घटणार आहे.

जेएनपीटी-वैतरणा विभाग डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करणे सुनिश्चित करण्यासाठी, समर्पित फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआईएल)चे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांनी नुकतीच या प्रकल्पाची तपासणी केली. यावेळी त्यांनी जेएनपीटी यार्ड, स्थानक इमारत, कुंदेवहाळ येथील बोगदा, गव्हाण फाटा आणि वहाळे धुमाळे येथी कामाची पाहणी केली.

तसेच नावडे रोड आणि निळजे दरम्यान सुमारे १० किमी ट्रॅकच्या कामाची पाहणी केली. तसेच तळोजा येथील प्रकल्प निरीक्षण कक्षाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कक्षामुळे प्रत्येक कामाचा आढावा वेळेत आणि योग्य प्रकारे घेता येणे शक्य होणार आहे.

१०३ किमीचा परिसर व्यापला

वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचा जेएनपीटी-वैतरणा विभाग १०३ किमीपर्यंत पसरलेला आहे. खारबाव आणि तळोजाला जेएनपीटीशी जोडतो. या विभागात ५३ मोठे पूल, २४२ लहान पूल, ३ यार्ड/स्थानक इमारती आणि १.१७ किमी लांबीचे बोगदे आहेत. १० उड्डाणपूल, ९ भुयारी मार्गाचे बांधकाम येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in