

मुंबई : ऐन दिवाळीत जोगेश्वरी पश्चिम येथील ‘जेएनएस बिझनेस पार्क’ या १३ मजली व्यावसायिक इमारतीत गुरुवारी सकाळी १०.४५ ते ११.०० वाजताच्या सुमारास लागलेल्या आगीत इमारतीचे चार मजले आगीच्या विळख्यात सापडले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
या इमारतीत खासगी कार्यालय असून आगीत एकूण २७ जण अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलाने लेव्हल ३ ची आग घोषित केली. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण समजू शकले नाही.
जोगेश्वरी पश्चिम येथील बेहराम बाग या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात ‘जेएनएस बिझनेस पार्क’ ही इमारत आहे. या इमारतीत अनेक खासगी कार्यालये असून सकाळच्या सुमारास या इमारतीत अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर ती नवव्या ते १३ व्या मजल्यावर पसरली व इमारतीचे पाच मजले आगीच्या विळख्यात सापडले. आग लागली तेव्हा इमारतीत २७ जण अडकले होते. त्यामध्ये दोन स्त्रिया आणि २५ पुरुषांचा समावेश होता. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, यापैकी १७ जण आगीमुळे पसरलेल्या धुराने गुदमरले. त्यामुळे ९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी ८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले.
उंच इमारतीला भीषण आग लागल्याने परिसरात मोठी घबराट पसरली होती. पण अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून ही आग नियंत्रणात आणली. दरम्यान, आग कशामुळे लागली याबाबत ओशिवरा पोलीस आणि अग्निशमन दलातील जवानांकडून चौकशी करण्यात येत आहे. या इमारतीतील कार्यालयामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, नवी मुंबईत केवळ दोन दिवसांपूर्वी दोन आगीच्या घटना घडल्या होत्या. त्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. गेल्या काही दिवसांत शहरात आग लागण्याच्या वाढत्या घटनांमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
इमारतीत अडकलेल्या लोकांचा मदतीसाठी धावा
आग लागल्यानंतर इमारतीच्या वरच्या मजल्यांवर काही लोक अडकले होते. त्यांनी मदतीसाठी हाका मारल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत एका बाजूला आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले, तर दुसऱ्या बाजूला इमारतीत अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. अथक प्रयत्नांनंतर ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत कुणालाही झाली नाही.