"मुंबई पोलिस नालायक", निखिल वागळेंच्या टीकेवर पोलिसांचे प्रत्युत्तर - 'सुशिक्षित आहात, सभ्य भाषा वापरा'

"मुंबई पोलिस नालायक", निखिल वागळेंच्या टीकेवर पोलिसांचे प्रत्युत्तर - 'सुशिक्षित आहात, सभ्य भाषा वापरा'

ज्येष्ठ मराठी पत्रकार निखिल वागळे यांनी शुक्रवारी, तक्रार दाखल करून ४८ तास उलटले तरीही तक्रारीची प्रत मिळाली नसल्याचे म्हणत मुंबई पोलिस 'नालायक' असल्याची टीका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (आधीचे ट्विटर) वर केली होती.
Published on

मुंबई, २७ जानेवारी : ज्येष्ठ मराठी पत्रकार निखिल वागळे यांनी शुक्रवारी, तक्रार दाखल करून ४८ तास उलटले तरीही तक्रारीची प्रत मिळाली नसल्याचे म्हणत मुंबई पोलिस 'नालायक' असल्याची टीका सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (आधीचे ट्विटर) वर केली होती. त्यांच्या पोस्टला मुंबई पोलिसांनी अधिकृत अकाऊंटद्वारे उत्तर दिले असून वागळे यांचे आरोप फेटाळून लावत त्यांना योग्य भाषा वापरण्याचा सल्ला दिला आहे.

"मुंबई पोलीस नालायक आहेत. तक्रारीची पोचही ४८ तासात नाही. माहीम पोलीस स्टेशन तर भंगारात विकलं पाहिजे. आमेन", असे लिहून वागळेंनी मुंबई पोलिसांना टॅग केले होते. त्यावर, आपण सुशिक्षित आहात, त्यामुळे सभ्य भाषा वापरावी, असे प्रत्युत्तर पोलिसांनी दिले आहे. तसेच, वागळेंचे आरोप फेटाळून लावत, आपल्या तक्रारीवरून २४ जानेवारी रोजी अदखलपात्र गुन्हाही नोंद केला. अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण भेटण्यास नकार दिला, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.

"आम्ही सखोल माहिती घेतली आहे. आपल्या तक्रारीवरून दि. २४/०१/२४ रोजी अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला असून आपणास कळविण्यात आलेले आहे. अधिक माहिती घेण्यासाठी आपल्या घरी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आपण भेटण्यास नकार दिला. तक्रारीची प्रत पोलीस ठाणे येथून प्राप्त करून घेण्याबाबत सुध्दा आपणास कळविण्यात आलेले आहे. व्यक्तीविशेषसाठी घरपोच प्रत पोहचविण्याचे प्रावधान नाही.आपण शिक्षित आहात, संयमित भाषा वापरणे अपेक्षित आहे", असे उत्तर मुंबई पोलिसांनी वागळेंना दिले आहे.

निखिल वागळे विरूद्ध मुंबई पोलिस-

दरम्यान, हे वृत्त लिहेपर्यंत वागळे यांनी मुंबई पोलिसांच्या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तथापि, काही नेटकऱ्यांनी वागळेंविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्याची मागणी केली आहे. २३ जानेवारी रोजी, काही उपद्रवी व्यक्ती आपल्याला त्रास देत आहेत असे सांगत मुंबई पोलिसांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप वागळेंनी केला होता. "मुंबई पोलिस नियंत्रण कक्ष पूर्णपणे निरुपयोगी आहे. अतिशय उद्धट. उच्च अधिकारी गेल्या 2 दिवसांपासून योग्य प्रतिसाद देत नाहीत. नागरिक, पत्रकार हतबल आहेत. कालपासून काही उपद्रवी घटक मला त्रास देत आहेत," अशी पोस्ट त्यांनी केली होती.

त्यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना, मुंबई पोलिसांनी, "प्रिय निखिल वागळे, तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. कृपया त्वरित कारवाईसाठी तुमच्या जवळच्या पोलिस स्टेशनला या प्रकरणाची तक्रार करा. तुमची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे आणि आम्ही तुम्हाला खात्री देतो की तक्रार योग्यरित्या नोंदवली जाईल." असे प्रत्युत्तर दिले होते. पोलिसांच्या प्रतिक्रियेनंतर सुमारे तासाभरानंतर वागळे यांनी पुन्हा पोस्ट टाकली. यावेळी त्यांनी कारवाई केल्याबद्दल डीसीपी मनोज पाटील आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. त्यासोबतच, "मी उद्या सकाळी गैरवर्तन करणाऱ्या 'संघी'विरुद्ध तक्रार दाखल करेन. मी त्याचे नाव उघड करीन. परंतु पोलिस नियंत्रणाविरुद्धची माझी तक्रार अद्यापही ऐकलेली नाही," असे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत नमूद केले होते.

logo
marathi.freepressjournal.in