

मुंबई : जुहू परिसरात शुक्रवारी रात्री ११ वाजता एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ज्येष्ठ गायक तलत अझीझ यांच्यासह पाच जण जखमी झाले. आगीनंतर निर्माण झालेल्या धुरामुळे गुदमरल्याने त्यांना त्रास झाला. सर्व जखमींना तातडीने भारतीया आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
इस्कॉन मंदिराजवळ तळ अधिक पाच मजली निवासी इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील सुमारे १० बाय १५ फुटांच्या खोलीत आग लागल्याची घटना घडली. काही वेळातच ही आग वाऱ्यासारखी पसरली आणि इमारतीत धुराचे लोट पसरले. त्यामुळे इमारतीच्या वरच्या मजल्यांवरील रहिवासी अडकले होते. शुक्रवारी रात्री सुमारे १०.५६ वाजता आग लागल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळताच जवान घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर रात्री सुमारे १२ च्या सुमारास आग नियंत्रणात आली. घटनास्थळी पोलीस, अदानी इलेक्ट्रिसिटी तसेच संबंधित महापालिका विभागाचे कर्मचारीही दाखल झाले होते.
या दुर्घटनेत तलत अझीझ, शाहीन अझीझ, अदनान अझीझ, बिना अझीझ आणि सिकंदर सिंह हे जखमी झाले. धुरामुळे गुदमरल्याने त्यांना त्रास झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तलत अझीझ आणि शाहीन अझीझ यांना अतिदक्षता विभागात दाखल केले होते. त्यांची प्रकृती स्थिर होती.
अदनान अझीझ यांची प्रकृती सुरुवातीला गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते. बिना अझीझ यांनाही अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते, तर सिकंदर सिंह यांच्यावर सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, उपचारानंतर पाचही जखमींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.