मुंबईतील जम्बो रुग्णालये बंद होणार ; सेव्हन हिल्स, सोमय्या जम्बो रुग्णालय सुरू राहणार - महानगरपालिका

चौथी लाट सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जम्बो रुग्णालये बंद करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता
मुंबईतील जम्बो रुग्णालये बंद होणार ; सेव्हन हिल्स, सोमय्या जम्बो रुग्णालय सुरू राहणार - महानगरपालिका
ANI

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता मुंबईतील सर्व जम्बो करोना रुग्णालये बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. मात्र केवळ मरोळ येथील सेव्हन हिल्स आणि चुनाभट्टीजवळील के. जे. सोमय्या जम्बो रुग्णालय सुरू राहणार आहेत.

मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वेगाने होणारी रुग्णवाढ लक्षात घेता महानगरपालिकेने सर्वप्रथम बीकेसी येथे पहिले जम्बो करोना रुग्णालय सुरू केले. त्यानंतर हळूहळू मुंबईत दहा जम्बो रुग्णालये सुरू करण्यात आली. कोरोनाची तिसऱ्या लाट ओसरल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मोजकीच जम्बो रुग्णालये शहरात सुरू ठेवली होती, अन्य रुग्णालये बंद केली होती. यातील काही रुग्णालये बंद करण्यात आली होती. मात्र आवश्यकता भासल्यास ती पुन्हा सुरू करता यावी यादृष्टीने तेथे यंत्रणा ‘जैसे थे’ ठेवण्यात आली होती. चौथी लाट सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जम्बो रुग्णालये बंद करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.

कोरोनाच्या चौथ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढली तरी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या तुलनेने फार कमी होती. सध्या रुग्णालयात १९२ रुग्ण दाखल आहेत. दैनंदिन सुमारे अडीचशे रुग्ण नव्याने आढळत असले तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या २० पेक्षाही कमी आहे. करोनाचा प्रादुर्भावही आता कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेले गोरेगावचे नेस्को, बीकेसी, मुलुंड, भायखळा येथील रिचर्डसन अण्ड क्रुडास, वरळीचे एनएससीआय, कांजुरमार्ग, दहिसर आणि मालाड ही जम्बो रुग्णालये पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in