शिंदेंच्या शिवसेनेत जम्बो भरती; विभागप्रमुख, महिला विभाग संघटक, युवासेनेतील पदाधिकारीपदासाठी संधी

आगामी मुंबई महापालिका, महापालिका, नगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रणनीती आखली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेत जम्बो भरती; विभागप्रमुख, महिला विभाग संघटक, युवासेनेतील पदाधिकारीपदासाठी संधी
एक्स @mieknathshinde
Published on

मुंबई : पक्ष मजबुतीकरण आणि शिवसेनेचा प्रसार, शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचावी, नागरिकांच्या समस्या जाणून घेत तातडीने सोडणे यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विभाग प्रमुख, महिला विभाग संघटक, युवासेना, सोशल मीडिया सैनिक आदी पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छूक उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. मुंबई उत्तर मध्य लोकसभा, दक्षिण मध्य लोकसभा अशा पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. आगामी मुंबई महापालिका, महापालिका, नगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रणनीती आखली आहे.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःची शिवसेना स्थापन केली. शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला पसंती दिली आहे. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यात आगामी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई महापालिकेत भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने अँक्शन प्लॅन तयार केला आहे. यात शिवसेनेच्या मजबुतीकरणावर भर दिला आहे. शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी शिवसेनेत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले असून २८ ते ३१ जानेवारी दरम्यान थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. 

मुंबई पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून १३ जानेवारी रोजी रंगशारदा सभागृहात बैठक पार पडली. बैठकीत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबई क्षेत्रात विविध पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पदांसाठी भरती 

विभाग प्रमुख, उपविभाग समन्वयक, महिला विभाग संघटक, शाखाप्रमुख, विधानसभा प्रमुख (महिला व पुरुष), शाखा समन्वयक, विधानसभा संघटक, महिला शाखा संघटक, विधानसभा समन्वयक, युवासेना व सोशल मीडिया सैनिक

logo
marathi.freepressjournal.in