

मुंबई : पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या जेव्हीपीडी (जुहू-विलेपार्ले डेव्हलपमेंट स्कीम) उड्डाणपुलाचे काम ३१ डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. या उड्डाणपुलामुळे गर्दीच्या वेळेत सध्या सुमारे ४५ मिनिटे लागणारा प्रवास २० मिनिटांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच, परिसरातील पाच प्रमुख वाहतूक जंक्शन टाळता येणार असल्याने जुहू, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि वर्सोवा परिसरातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
अंधेरी पश्चिम येथील सी. डी. बर्फीवाला उड्डाणपुलाच्या टोकापासून जुहू-वेसावे जोड रस्त्यापर्यंत हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाची अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी करून कामाच्या प्रगतीचा, वाहतूक व्यवस्थापनाचा आणि बांधकामाच्या कालमर्यादेचा आढावा घेतला. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२७ अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पायाभूत सुविधांचे स्थलांतर मोठे आव्हान
उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान जलवाहिन्या आणि मलवाहिन्यांचे स्थलांतर करणे, तसेच मेट्रो मार्गिका २ बीच्या कामाशी समन्वय साधणे, ही प्रमुख आव्हाने आहेत. यामध्ये ६०० आणि ९०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिन्या ४०० मीटर लांबीमध्ये स्थलांतरित कराव्या लागणार आहेत तसेच १२०० मिमी व्यासाच्या मलवाहिनीचे सूक्ष्म बोगदा तंत्रज्ञानाद्वारे स्थलांतर आणि ३०० मिमी व्यासाची मलवाहिनी स्थलांतरित करून नव्याने टाकण्याची कामे करण्यात येणार आहेत.
तीन टप्प्यांत कामांना गती देण्याचे निर्देश
प्रकल्पातील विविध कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संपूर्ण बांधकामाची तीन टप्प्यांत विभागणी करावी. प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करून कामे समांतर पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश अभिजीत बांगर यांनी दिले. पायाभूत सुविधांचे स्थलांतर, मेट्रो प्रकल्पाशी समन्वय आणि उड्डाणपुलाच्या बांधकामाचे नियोजन प्रभावीपणे केल्यास निर्धारित उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे.
या उड्डाणपुलामुळे पश्चिम उपनगरांमधील वाहतूक अधिक सुरळीत होण्याबरोबरच प्रमुख चौकांवरील वाहनांचा ताण कमी होईल.
असा आहे पूल
जेव्हीपीडी उड्डाणपुलाची एकूण लांबी १ हजार ७५० मीटर, तर रुंदी १५.१० मीटर आहे. पश्चिम उपनगरांतील रस्ते संपर्क अधिक सुलभ करणे आणि प्रमुख चौकांमधील वाहतुकीचा ताण कमी करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. प्रस्तावित वेसावे-वांद्रे सागरी सेतू तसेच मुंबई किनारा रस्ता (उत्तर) या मार्गांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठीही हा उड्डाणपूल महत्त्वाचा ठरणार आहे.