'बॉम्बे' हे महाराष्ट्राचे शहरच नाही! तमिळनाडूतून प्रचाराला आलेले भाजप नेते के. अण्णामलाई यांची मुक्ताफळे

भाजप नेते के अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत हे शहर महाराष्ट्राचे नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबईच्या व्यवस्थापनासाठी योग्य लोक बीएमसीमध्ये बसवावे लागतील, असेही अण्णामलाई म्हणाले. अण्णामलाईंच्या या वक्तव्यावरून आता मोठा वादंग माजण्याची शक्यता दिसत आहे. तसेच पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबईसह राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराची रणधुमाळी टिपेला पोहोचलेली असताना आणि मुंबई मराठी माणसाची की आणखी कुणाची या मुद्द्यावरून राजकारण तापलेले असताना तमिळनाडूतून मुंबईत प्रचारासाठी आलेल्या भाजप नेत्याने त्यात तेल ओतले आहे.

भाजप नेते के अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करत हे शहर महाराष्ट्राचे नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबईच्या व्यवस्थापनासाठी योग्य लोक बीएमसीमध्ये बसवावे लागतील, असेही अण्णामलाई म्हणाले. अण्णामलाईंच्या या वक्तव्यावरून आता मोठा वादंग माजण्याची शक्यता दिसत आहे. तसेच पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप मोठ्या अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

मुंबईत भाजपचा महापौर असेल...

के अण्णामलाई हे तामिळनाडूतील भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असून ते मुंबईत प्रचारासाठी आले आहेत. भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारादरम्यान त्यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अण्णामलाई माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, 'मोदीजी हे केंद्रामध्ये आहेत, देवेंद्रजी राज्यामध्ये आहेत आणि मुंबईमध्ये भाजपचा महापौर असेल. कारण मुंबई हे महाराष्ट्राचे शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराचे बजेट हे ७५ हजार कोटी रुपये इतके आहे. चेन्नईचे बजेट हे ८ हजार कोटी तर बंगळुरुचे बजेट हे १९ हजार कोटी रुपयांचे आहे. त्यामुळे मुंबईचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला चांगले लोक प्रशासनात बसवावे लागतील. जेणेकरून शहराच्या बजेटचा योग्य वापर होईल'.

राज्यभरातून उठली टीकेची झोड

के. अण्णामलाई यांच्या वक्तव्यानंतर आता राज्यभरातून टीकेची झोड उठवली जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अण्णामलाई यांच्या विधानाचा निषेध केला आहे. 'अण्णामलाईवर मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल करून अटक केली पाहिजे', अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली. भाजपचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला. भाजपवाले आता अण्णामलाईच्या लुंगीत तोंड लपवणार का?', असा सवाल त्यांनी विचारला.

अण्णामलाईने केला १०६ हुतात्म्यांचा अपमान

संजय राऊत पुढे म्हणाले की, "अण्णामलाईने १०६ हुतात्म्यांचा अपमान केला आहे. त्याच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे काय म्हणणे आहे? फडणवीस म्हणतात सूर्य, चंद्र, तारे असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राची असेल. मग तुमचे नेते असे म्हणतात, स्टार प्रचारक अशी वक्तव्ये कशी करतात ? अण्णा, फण्णा, झण्णा कुणीही असो, त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा, त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे. त्याला महाराष्ट्राबाहेर जाता आलं नाही पाहिजे."

logo
marathi.freepressjournal.in