
मुंबई : लहानसे का होईना मुंबईत आपले हक्काचे घर हवे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हक्काचे घर मुंबईत असावे यासाठी १ लाख २० हजार १४४ अर्जदार पात्र ठरले असून यापैकी मुंबईत हक्काच्या घराचा मालक कोण हे जाणून घेण्याची अर्जदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४०८२ घरांची संगणकीय सोडत सोमवारी काढण्यात येणार आहे. त्यामुळे लॉटरी उघडल्यानंतर ‘कहीं खुशी, कहीं गम’ असे चित्र पाहावयास मिळणार आहे.
म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ४०८२ सदनिकांच्या विक्रीसाठी १४ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. हा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत अंधेरी, जुहू, गोरेगांव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव, सायन येथे उभारण्यात आलेल्या घरांची सोडत काढण्यात येणार असल्याने आता नशीब अजमावण्याची वेळ आली असून अर्जदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.