काळा घोडा महोत्सवाला परवानगी मिळणार की नाही? 'या' दिवशी होणार निर्णय!

उच्च न्यायालय काय निर्णय देतेय, याकडे महोत्सव आयोजकांसह कलाप्रेमी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
काळा घोडा महोत्सवाला परवानगी मिळणार की नाही? 'या' दिवशी होणार निर्णय!

मुंबई : काळा घोडा कला व सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनासंबंधी उच्च न्यायालयातील सुनावणी लांबणीवर पडली आहे. महोत्सव आयोजित करण्यास परवानगी मागणाऱ्या आयोजकांच्या याचिकेवर बाजू मांडण्यासाठी सरकारने शुक्रवारी आणखी वेळ मागितला. त्यावर सुट्टीकालीन खंडपीठाने सुनावणी ५ जानेवारीपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे ५ जानेवारी रोजीच याबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे.

दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदानावर १५ ते १९ जानेवारी या कालावधीत काळा घोडा महोत्सव आयोजित करण्यास परवानगी द्या, अशी विनंती करीत काळा घोडा आर्ट असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. असोसिएशनच्या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती शिवकुमार डिगे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारतर्फे ॲड. ज्योती चव्हाण यांनी याचिकेवर बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागितला. सरकारची ही विनंती मान्य करीत खंडपीठाने सुनावणी आठवडाभर तहकूब केली. मुंबईच्या विकास आराखड्यानुसार क्रॉस मैदान हे क्रीडांगण आहे. न्यायालयाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय त्रयस्थ व्यक्तीला क्रॉस मैदान देण्यास उच्च न्यायालयाने यापूर्वीच मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना मज्जाव केला आहे. त्या पार्श्वभूमीवर महोत्सव आयोजकांनी उच्च न्यायालयाची परवानगी मागितली आहे. याबाबत न्यायालय काय निर्णय देतेय, याकडे महोत्सव आयोजकांसह कलाप्रेमी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in