मुंबई : काळबादेवी-चिराबाजार परिसरातील एका आवाराची भिंत सोमवारी दुपारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य एकजण जखमी झाला आहे. पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास या दुर्घटनेची माहिती मिळाली.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या फणसवाडीतील अग्यारी गल्लीत ही दुर्घटना घडली. तेथील ‘२०-७ गांधी’ इमारतीच्या भागातील सुमारे सात फूट उंचीची तसेच ३० फूट लांबीची आवारभिंत नजीकच्या घरगल्लीत कोसळली. कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तिघांची अग्निशमन दलाने सुटका केली. त्यापैकी विनयकुमार निषाद (३०) आणि रामचंद्र सहानी (३०) या दोघांना जीटी रुग्णालयात नेल्यावर मृत घोषित करण्यात आले. तर, सनी कनोजिया (१९) याच्यावर या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.