

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वे जाळ्यावरील दोन महत्त्वाच्या रेल्वे क्षमतावाढ प्रकल्पांचे काम वेगाने सुरू असून जुलैअखेरपर्यंत कल्याण-बदलापूर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेचे काम ५२% तर बोरिवली-विरार पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम ३०% पूर्ण झाले आहे. कल्याण-बदलापूर मार्गिकेचे काम २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाद्वारे ‘एमयूटीपी ३-ए’ अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पांचा मुख्य उद्देश मुंबईतील उपनगरीय मार्गांवर अतिरिक्त क्षमता निर्माण करणे आणि स्थानिक व लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक वेगळी करणे हा आहे.
१,५१० कोटी रुपये खर्चाचा कल्याण-बदलापूर प्रकल्प सध्याच्या दुहेरी मार्गिकेच्या सोबतीने आणखी दोन मार्गिका जोडणारा आहे. आतापर्यंत ३१ पुलांचे काम पूर्ण झाले असून, इतर पुलांचे बांधकाम सुरू आहे. एलसी-१ए आणि एमआयडीसी रस्ते वाहतुकीसाठी खुले केले आहेत. तर एलसी-४सी आणि एलसी-७ पुलांचे काम वेगाने सुरू आहे. एमआयडीसी पाईपलाईन पुलाचे काम मार्च २०२६ मध्ये पूर्ण करून ते एमआयडीसीकडे सुपूर्द करण्यात आले. चिखलोई स्थानकात स्टेशन आणि इमारतींचे बहुतांश नागरी काम पूर्ण झाले असून फक्त रंगकाम बाकी आहे. तीन पादचारी पूल, प्लॅटफॉर्मचे छत, प्लॅटफॉर्म आणि पोहोच रस्ता यांचे काम सुरू असून, सुमारे ५०० मीटरच्या आरसीसी प्लॅटफॉर्म भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. या अतिरिक्त मार्गिका सुरू झाल्यानंतर गर्दीच्या वेळेत लोकल गाड्यांची संख्या वाढेल आणि कल्याण-कर्जत मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांना अधिक लवचिकता मिळेल.
विरार-बोरिवली २०२९ पर्यंत?
पश्चिम रेल्वेवर २,१८४ कोटी रुपयांचा बोरिवली-विरार पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प २६ किमी अंतराचा असून २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. जमीन संपादन आणि वैधानिक मंजुरींचे काम पुढे सरकले असून, वसईतील उमेळमान येथील ११.९२९ हेक्टर कांदळवन जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे आणि उर्वरित संपादन सुरू आहे. या अतिरिक्त मार्गिकांमुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र क्षमता निर्माण होईल, ज्यामुळे सेवांचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येईल आणि गजबजलेल्या मार्गावरील तांत्रिक व परिचलन अडचणी कमी होतील, असे एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.