Kalyan Crime News: कल्याणमध्ये वर्दळीच्या रस्त्यात वडिलांची बीएमडब्ल्यू कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलासह (वय, १७) त्याच्या वडिलांवर (निवृत्त सरकारी अधिकारी) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, त्याच कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी करणाऱ्या एका तरुणाला (शुभम मितालिया, वय-२१) पोलिसांनी अटक केली. शुभम कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, कल्याण पश्चिमेतील गजबजलेल्या शिवाजी चौक परिसरात शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगा बीएमडब्ल्यू कार चालवत होता. तर, शुभम मितालिया कारच्या बोनेटवर झोपून स्टंटबाजी करत होता. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या स्टंटबाजीचा व्हिडिओ काही लोकांनी रेकॉर्ड केला. अल्पवयीन मुलगा ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय गाडी चालवत होता. अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिल्यामुळे वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पोलिसांनी नोटीसही बजावली आहे.
सोशल मीडियावरील रील्सने प्रेरित झालेल्या या मुलाने वडिलांकडे सुमारे ५ लाख रुपये किंमतीची सेकंड हँड बीएमडब्ल्यू खरेदी करण्याचा हट्ट धरला होता. कार वडिलांच्या नावावर नोंदणीकृत आहे, असे पोलिसांनी सांगितले. व्हिडिओ व्हायरल होताच कार, बोनेटवरील तरुण आणि अल्पवयीन मुलाचा शोध घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गेल्या आठवड्यात पुण्यात मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाने दोन निष्पापांचा बळी घेतल्यामुळे खळबळ उडाली असतानाच ही घटना समोर आली आहे.