कल्याण स्टेशन यार्डाच्या पुनर्रचनेचे काम युद्धपातळीवर सुरू लोकल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी भिन्न मार्गिका

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महत्त्वाच्या रेल्वे जंक्शनमध्ये मोठी सुधारणा होईल
कल्याण स्टेशन यार्डाच्या पुनर्रचनेचे काम युद्धपातळीवर सुरू लोकल, लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी भिन्न मार्गिका

मुंबई : कल्याण हे मध्य रेल्वेवरील मोठे जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकावर रोज ७५० गाड्या धावतात. लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या या स्थानकावर थांबत असल्याने दिवसाचे २४ तास हे स्थानक गर्दीने ओसंडून वाहत असते. यामुळे लोकल गाड्यांना विलंब होतो. यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वेने कल्याण स्टेशन यार्डाच्या पुनर्रचनेचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी भिन्न मार्गिका असेल. त्यातून गाड्या वेळेवर धावण्यास मदत मिळेल.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल यांनी बुधवारी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन कामाचा आढावा घेतला. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर रेल्वेची कार्यक्षमता वाढणार आहे.

या प्रकल्पामुळे रेल्वेचा परिचलनाचा कालावधी कमी होणार आहे. कल्याण स्थानकात रोज ७५० गाड्या धावतात. या नवीन प्रकल्पामुळे लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांची विभागणी होईल. सध्या दोन्ही प्रकारच्या गाड्या एकाच फलाटावर थांबतात. या प्रकल्पानंतर लोकलसाठी वेगळे फलाट असतील. त्यातून स्टेशनवरील गर्दी विभागण्यास मदत मिळेल. कल्याण स्थानकातून उत्तर व दक्षिणेकडे जाता येते. या स्टेशनवर अनेक क्रॉसिंग आहेत. त्यामुळे एक गाडी निघाल्याशिवाय दुसऱ्या गाडीला फलाटावर आणता येत नाही. त्यामुळे लोकल गाड्या कल्याणपूर्वी २० ते २५ मिनिटे थांबवल्या जातात, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.

चार नवीन फलाट उभारणार

मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, या प्रकल्पात ४ नवीन फलाट, फूट ओव्हर ब्रीज, उन्नत डेक उभारले जातील. या प्रकल्पासाठी ८६६ कोटी खर्च असून मध्य रेल्वेकडून त्याची अंमलबजावणी होईल.

या प्रकल्पाच्या स्थितीबाबत अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकल्पाचे कंत्राट वाटपाचे काम सुरू झाले आहे. छोटे ब्रीज, जमिनीचे सपाटीकरण, इमारतींच्या स्थळात बदल आदी कामे सुरू आहेत. जुने रेल्वे ट्रॅक काढण्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले. मात्र, हा प्रकल्प पूर्ण होण्यात अनेक बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतरच हा प्रकल्प पूर्ण होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महत्त्वाच्या रेल्वे जंक्शनमध्ये मोठी सुधारणा होईल. रेल्वेत सेवेत सुधारणा होईल.

logo
marathi.freepressjournal.in