
मुंबई : वेगवेगळ्या बँकांमध्ये ९४३ खाती उघडून शेकडो सायबर गुन्हे करत देशभरात ६० कोटींहून अधिक रक्कम लुटणाऱ्या कांदिवली येथील दोन बनावट कंपन्यांविरोधात कारवाई करून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण बारा जणांच्या टोळीला अटक केली.
कांदिवली पूर्व येथील डी. जी. सर्च कन्सल्टन्सी आणि प्रिरीत लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड या दोन बनावट कंपन्यांच्या कार्यालयावर छापे घालून गुन्हे अन्वेषण विभागाने अनेक बँक खात्यांचे पासबुक, चेकबुक, ई मेल अकाऊंट आणि त्याचे पासवर्ड, सीम कार्ड जप्त केले. ही सामग्री सायबर गुन्ह्यांसाठी वापरली जात असे. या ठिकाणी वैभव पटेल, सुनीलकुमार पासवन, अमनकुमार गौतम, खुशबू संदराजुळा, रितेश बांदेकर या आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लॅपटॉप, प्रिंटर, २५ मोबाइल फोन, २५ बँक पासबुक, ३० चेकबुक, ४६ एटीएम कार्ड, स्वाईप मशीन आणि १०४ मोबाईल सीमकार्ड हस्तगत करण्यात आले.
याबाबत समता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी केलेल्या तपासात लॅपटॉपचे तांत्रिक विश्लेषण केले असता धक्कादायक माहिती उघड होत गेली. या टोळीने आतापर्यंत ९४३ बँक खात्यांचा गैरवापर करत त्यापैकी १८१ बँक खाती सायबर गुन्ह्यांसाठी वापरली होती. त्याबाबत सायबर नियंत्रण कक्ष, हेल्प लाइन क्र. १९३० यावर डिजिटल अरेस्ट, ऑनलाइन शॉपिंग, शेयर ट्रेडिंग अशा मार्गाने फसवणूक करण्यात आल्याच्या तब्बल ३३९ तक्रारी दाखल आहेत. त्यापैकी १६ तक्रारी मुंबईत दाखल असून १४ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उर्वरित महाराष्ट्रात ४६ तक्रारींपैकी १२ गुन्हे दाखल आहेत. तर इतर राज्यांतील २७७ तक्रारींपैकी ३३ प्रकरणांत गुन्हे दाखल असल्याचे आढळले आहे. ज्या प्रकरणात गुन्हे दाखल नाहीत अशा इतर प्रकरणांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रक्कम लुटली
बँक खात्यांतून केवळ मुंबईतून १ कोटी ६८ लाख, उर्वरित महाराष्ट्रात १० कोटी ५७ लाख, तर देशभरातून ६० कोटी ८२ लाख रुपये लुटण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे.