कांदिवलीतील दुहेरी हत्येतील आरोपीला २२ वर्षांनी अटक ;प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी ठरविल्याने आई-वडिलांना पेटवून दिले

गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मोहीद्दीन शेख, नागनाथ तेलंगे आणि व्यंकट पाचवाड या तिघांना पोलिसांनी अटक केली होती.
कांदिवलीतील दुहेरी हत्येतील आरोपीला २२ वर्षांनी अटक ;प्रेयसीचे लग्न दुसऱ्याशी ठरविल्याने आई-वडिलांना पेटवून दिले

मुंबई : कांदिवलीतील दुहेरी हत्येतील एका वॉण्टेड मुख्य आरोपीस २२ वर्षांनी पुण्यातून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. यशवंत बाबूराव शिंदे असे या आरोपीचे नाव असून, अटकेनंतर त्याला कुरार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. याच गुन्ह्यांत यापूर्वी पोलिसांनी तिघांना अटक केली होती; मात्र नंतर त्यांची सेशल कोर्टाने निर्दोष सुटका केली.

जहराबी रेहमान ही महिला तिच्या पती अब्दुल रेहमान यांच्यासोबत कांदिवलीतील क्रांतीनगर, हनुमान चाळीतील गुडलक हॉटेलमध्ये असताना १२ ऑगस्ट २००१ रोजी अज्ञात व्यक्तीने हॉटेलला आग लावली होती. या आगीत जहराबी आणि तिचे पती अब्दुल रेहमान हे गंभीररीत्या भाजले होते. त्यांच्यावर भगवती रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान या पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर कुरार पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध दुहेरी हत्येसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मोहीद्दीन शेख, नागनाथ तेलंगे आणि व्यंकट पाचवाड या तिघांना पोलिसांनी अटक केली होती.

चौकशीत या गुन्ह्यांचा मुख्य सूत्रधार यशवंत शिंदे असल्याचे उघडकीस आले होते. त्याचे जहराबीच्या मुलीशी एकतर्फी प्रेमसंबंध होते. ही माहिती समजताच त्यांनी त्याला बेदम मारहाण करून समज दिली होती. त्यातच त्यांनी त्यांच्या मुलीचे दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरविले होते. ही माहिती समजताच यशवंत प्रचंड चिडला होता. त्यातून त्याने प्रेयसीच्या आई-वडिलांचा सूड घेण्यासाठी हॉटेलला आग लावली होती. या आगीत या दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर तो पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती, मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना चकमा देत होता.

प्रतिक्रिया

शोधमोहीम सुरू असतानाच तो पुण्यात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तो स्वतची ओळख लपवून राहत होता. याच दरम्यान त्याने लग्न केले होते. तो त्याच्या कुटुंबीयासह कुठल्याही नातेवाईकांच्या संपर्कात नव्हता. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांत इतर तीन आरोपींचा सहभाग उघडकीस न आल्याने त्यांची न्यायालयाने सुटका केली आहे.

- सुधीर दळवी, प्रभारी पोलीस निरीक्षक

logo
marathi.freepressjournal.in