
मुंबई : कांदिवली पूर्व येथील राम किशन मेस्त्री चाळीतील एका दुकानात बुधवारी सकाळी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन भीषण आग लागली. ही घटना सकाळी ९:०५ वाजताच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, राम किसन मिस्त्री चाळीतील एका दुकानात ही दुर्घटना घडली. अचानक एलपीजी सिलिंडरमधून गॅस गळती होऊ लागली आणि आगीचा भडका उडाला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. यादरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे काम सुरू केले. मात्र, आगीचे लोळ प्रचंड असल्याने विद्युत यंत्रणानाही आगीने वेढले. दरम्यान, ९.३३ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले.
या दुर्घटनेत एकूण सात जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी तीन जखमींची स्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी ईएसआयसी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या जखमींमध्ये शिवानी गांधी (वय ५१) या ७० टक्के भाजल्या आहेत. नीतू गुप्ता (वय ३१) ८० टक्के भाजल्या आहेत आणि जानकी गुप्ता या (वय ३९) ७० टक्के भाजल्या आहेत. अन्य जखमींमध्ये रक्षा जोशी (वय ४७) ८५-९० टक्के भाजल्या आहेत, तर दुर्गा गुप्ता (वय ३०) ८५-९० टक्के भाजल्या आहेत. पूनम (वय २८) या ९० टक्के भाजल्या आहेत. मानाराम कुमाकत (वय ५५) हे ४० टक्के भाजले आहेत. रक्षा जोशी यांना कस्तुरबा रुग्णालयात पुढील उपचारांसाठी हलवण्यात आले आहे. दुर्गा गुप्ता आणि पूनम यांना बोरिवली येथील सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चार जणांना ऐरोली येथील बर्न रुग्णालयात हलवण्यात आले आहे.