
मेघा कुचिक / मुंबई
रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी वसुलीच्या प्रकरणात कांदिवली पोलिसांनी रविवारी शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी लालसिंह राजपुरोहित यांना अटक केली. त्याच्यावर आणखी एका फसवणुकीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आम्ही आरोपीला खंडणी वसुलीच्या धमकीप्रकरणी अटक केली आहे, त्यांचा अटकपूर्व जामिनाची याचिका सत्र न्यायालयाने फेटाळली. त्यांना सोमवारर न्यायालयात हजर करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त (झोन ११) आनंद भोईटे यांनी सांगितले.
पोलिसांनी २८ डिसेंबर रोजी राजपुरोहित आणि त्याच्या सहा कार्यकर्त्यांविरोधात रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आला होता.
आरोपींची ओळख लालसिंह राजपुरोहित, गणेश पवार, पिंटो जयस्वाल, विकास गुप्ता, निलेश जयस्वाल आणि सुरेश शाह म्हणून झाली आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून नंतर त्यांना जामिन मिळाला.
२७ डिसेंबरला १.३० वाजता ही घटना घडली होती. आरोपींनी ठेकेदाराला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि त्याच्याकडे काम सुरू करण्याआधी ५ लाख रुपये देण्याची मागणी केली.
तक्रारदार आशिष मल्हा (२९), सांताक्रुझ (पश्चिम) येथील रहिवासी असून बीपीसीएल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करतो. कंपनीला इराणी वाडी, आर वॉर्डमध्ये सिमेंट रस्ता बांधण्याचे काम मिळाले होते. मल्हा यांच्या तक्रारीनुसार, २७ डिसेंबरला १.३० वाजता २० ते २५ कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी कंपनीच्या इंजिनिअर विजयनाथ चौरसिया आणि विनीत सिंग यांना मारहाण केली.