कंगना अख्तर वाद सेलिब्रिटी असला तरी आरोपी आहात दंडाधिकारी न्यायालयाने कान उपटले

कंगना अख्तर वाद
सेलिब्रिटी असला तरी आरोपी आहात
दंडाधिकारी न्यायालयाने कान उपटले

सेलिब्रिटी असला तरी मानहानीच्या खटल्यात आरोपी आहात हे विसरू नका, अशा शब्दात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावत हीचे कान टोचले. गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मागणी करणारा कंगनाचा अर्ज दंडाधिकारी आर. आर. खान यांनी मंगळवारी फेटाळून लावला. त्यानंतर आदेशाची प्रत गुरूवारी उपलब्ध झाली.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली होती. मात्र, आपला संबंध नसतानाही खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केल्यामुळे आपली विनाकारण बदनामी झाली आहे. याचा आपल्याला प्रचंड मनस्ताप झाला असल्याचे सांगत कंगनावर मानहानीचा फौजदारी खटला चालवावा, अशी मागणी जावेद अख्तर यांनी अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाकडे केली. याप्रकरणी न्यायालयाने कंगनाला यापूर्वीच जामीन मंजूर करताना या प्रकरणी बजावण्यात आलेले वॉरंट रद्द केले. त्यानंतर अन्य न्यायालयात खटला वर्ग करण्याचे विनंतीही अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फेटाळल्यानंतर कंगनाने खटल्यात सुनावणीवेळी कायमस्वरूपी गैरहजर राहण्याची सुट द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज केला होता.

Related Stories

No stories found.