कंगनाचा ‘तो’ बंगला ३२ कोटींना विकला!
मुंबई : महापालिकेच्या धडक कारवाईमुळे चर्चेत आलेला अभिनेत्री कंगना रानौत यांच्या पाली हिल येथील बंगल्याने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा बंगला रानौत यांनी ३२ कोटी रुपयांना विकला आहे. कमालिनी होल्डिंग्ज कंपनीने हा बंगला विकत घेतला आहे. मुंबई महापालिकेने या बंगल्याचा काही भाग अनधिकृत बांधकाम ठरवून ते पाडण्याची कारवाई केली होती.
वांदे पश्चिम येथील नगरगिस दत्त मार्गावर स्थित हा बंगला कंगना रानौत यांनी २०१७ मध्ये २० कोटींना विकत घेतला होता. कंगना यांनी आपल्या सोयीनुसार बंगल्यात काही बदल केले होते जे पालिकेने बेकायदशीर असल्याचे ठरवले होते. कोविड काळात लॉकडाऊन सुरू असताना महापालिकेने रानौत यांना नोटीस पाठविली होती. २४ तासात नोटिशीला उत्तर न दिल्यास बंगल्यावर कारवाईचा इशाराही पालिकेने दिला होता आणि शेवटी पालिकेने बुलडोझर व संपूर्ण फौजफाट्यासह हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची धडक कारवाईसुद्धी केली होती.
या घटनेनंतर ४ वर्षांनी कमलिनी होल्डिंग्जने हा बंगला रानौत यांच्याकडून ३२ कोटी रुपयांना विकत घेतला. ३०७५ चौ़ ट इतक्या परिसर बंगल्याने व्यापला असून त्याला तळमजला व तीन माळे आहेत. खरेदीदाराला या बंगल्यासाठी १ कोटी ९० लाखांची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली. पालिकेच्या कारवाईला विरोध करण्यासाठी रानौत यांनी त्यावेळी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पालिकेची कारवाई वाईट हेतूने केली असल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने कारवाई थांबवण्याचे आदेश दिले होते.