कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर हरित क्षेत्राची निर्मिती; दुर्गंधी मुक्तीसाठी बफर झोनमध्ये विशिष्ट १५ हजार झाडांची लागवड; अश्विनी भिडेंनी केली पाहाणी

कांजूर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यामुळे विक्रोळी कन्नमवार नगर दुर्गंधीमुक्त करण्यासाठी आता ५०० मीटर परिसरात बफर झोनची निर्मिती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. कांजूर डम्पिंग ग्राऊंडवरील एक लाख स्क्वेअर मीटर उपलब्ध जागेत दुर्गंधी कमी करणाऱ्या विशिष्ट झाडांची लागवड करण्यात येणार आहे.
कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर हरित क्षेत्राची निर्मिती; दुर्गंधी मुक्तीसाठी बफर झोनमध्ये विशिष्ट १५ हजार झाडांची लागवड; अश्विनी भिडेंनी केली पाहाणी
कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर हरित क्षेत्राची निर्मिती; दुर्गंधी मुक्तीसाठी बफर झोनमध्ये विशिष्ट १५ हजार झाडांची लागवड; अश्विनी भिडेंनी केली पाहाणी
Published on

मुंबईः कांजूर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यामुळे विक्रोळी कन्नमवार नगर दुर्गंधीमुक्त करण्यासाठी आता ५०० मीटर परिसरात बफर झोनची निर्मिती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. कांजूर डम्पिंग ग्राऊंडवरील एक लाख स्क्वेअर मीटर उपलब्ध जागेत दुर्गंधी कमी करणाऱ्या विशिष्ट झाडांची लागवड करण्यात येणार आहे. १२ ते १८ मीटर उंच, ८ ते १० मीटर उंच व अन्य १० हजार रोपटी अशी एकूण १५ हजार झाडांची लागवड ५ जून पर्यावरण दिनापासून करण्यात येणार आहे.

कांजूर डम्पिंग ग्राउंडसह कचरा हस्तांतरण केंद्रांवर हरित क्षेत्राची निर्मिती करण्यात येणार आहे. महानगर गॅस कंपनीची ८ एकर जमीन असून त्याठिकाणी ३५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन वीजनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दिवाळीपर्यंत वीजनिर्मिती प्रकल्प पूर्ण होईल आणि मुंबईकरांना त्यातून वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी सकाळी कांजूर डम्पिंग ग्राउंडची पहाणी केली. प्रत्येक गोष्टींची वेळेत अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्त अश्विनी भिडे यांनी यावेळी दिले. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर, उपायुक्त प्रशांत गायकवाड उपस्थित होते.

कन्नमवार नगर परिसरात रात्री पसरते दुर्गंधी मुंबईत दररोज ७ हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणाऱ्या कचऱ्यावर कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावली जाते. मात्र मुंबईतून जमा होणारा कचरा कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर आल्यावर वर्गीकरण केले जाते. मात्र यात नॉनव्हेज, किचन मधील अन्य खाद्यपदार्थ अधिक असल्याने कन्नमवार नगर परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. त्यावर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी सूचना मुख्य सचिव, अर्बन डेव्हलपमेंट व पालिका आयुक्त यांच्या समितीने केली आहे. त्यानुसार काही गोष्टींची अंमलबजावणी व्हावी यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी बुधवारी पहाणी केली.

बफर झोनची करणार निर्मिती

कांजूर डम्पिंग ग्राउंड व कन्नमवार नगर दुर्गंधी मुक्त करण्यासाठी कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर ५०० मीटर परिसरात बफर झोनची निर्मिती करण्यात येणार आहे. आयुक्त अश्विनी भिडे यांनी कन्नमवार नगर आणि डम्पिंग ग्राऊंडदरम्यान ग्रीन बफर झोन विकसित करण्याचे निर्देश दिले आहेत. कांजूर येथे एकूण ११८.१४ हेक्टर जमिनीवर (सुमारे २९२ एकर) नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जात आहे. सद्यस्थितीत प्रति दिन सुमारे ५२०० मेट्रिक टन नागरी घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने बायोरिऍक्टर तंत्रज्ञानाद्वारे आणि १००० मेट्रिक टन नागरी घनकचऱ्यावर खत निर्मिती तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्यात येत आहे. नागरी घनकचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूपासून काही प्रमाणात वीज निर्मिती होते. ही वीज याच प्रकल्पासाठी वापरण्यात येते. उर्वरित मिथेन वायू हा शास्त्रोक्त पद्धतीने जाळण्यात येतो. नागरी घनकचऱ्याचा हवेशी संपर्क होऊ नये व दुर्गंधी पसरू नये तसेच निर्माण होणारा वायू हवेत पसरू नये, याकरिता कचऱ्यावर मातीचे आवरण टाकण्यात येते.

बायोमायनिंगमुळे प्रदूषणात घट

देवनार क्षेपणभूमी सन १९२७ पासून कार्यरत असून क्षेपणभूमीचे क्षेत्रफळ सुमारे १२० हेक्टर आहे. देवनार क्षेपणभूमी येथे सद्यस्थितीत सुमारे ६०० मेट्रिक टन इतका नागरी कचरा टाकण्यात येतो. तसेच, १८५ लाख मेट्रिक टन इतका जुना साठलेला कचरा आहे. येथील साचलेल्या जुन्या घनकचऱ्यावर बायोमायनिंगचे काम महानगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. त्याअंतर्गत जुन्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने वर्गीकरण करून त्यातून माती, पुनर्वापरयोग्य साहित्य व उर्वरित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत आहे. बायोमायनिंगमुळे क्षेपणभूमीवरील कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरणीय प्रदूषणात घट होण्यास मदत होत आहे.

दुर्गंधीच्या तक्रारीसाठी कंट्रोल रुम तयार

कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. यावेळेस दुर्गंधी पसरत असल्यास परिसरातील नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत साधला संवाद

महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 'एस' विभागातील विक्रोळी (पूर्व) स्थित कन्नमवार नगर स्वच्छता कामगारांच्या चौकीस आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. तसेच, चौकीवरील स्वच्छता कर्मचाऱ्यांसमवेत संवाद साधत त्यांच्या उपस्थितीची नोंद, कामांचे स्वरूप, कामकाजाच्या वेळा, आवश्यक साहित्याचा पुरवठा तसेच उपलब्ध सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. मुंबईतील रस्ते आणि त्याभोवतीचा परिसर, चौक स्वच्छतेकडे व्यापक लक्ष देऊन परिसर स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य द्यावे. कचरा साचणाऱ्या ठिकाणांचा शोध घेऊन त्यांचे समूळ उच्चाटन करावे. त्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.

वीजनिर्मिती प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण

'कचऱ्यापासून वीजनिर्मिती' या प्रकल्पामध्ये प्रतिदिन सुमारे ६०० मेट्रिक टन नागरी घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून सुमारे ८ मेगावॅट पर्यंत वीज निर्मिती होणार आहे. सद्य स्थितीत प्रकल्पाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. बांधकाम व उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. या सर्व कामांची पाहणी अश्विनी भिडे यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in