Mumbai Metro : मेट्रो-६ कारशेडसाठी कांजूरची जागा एमएमआरडीएकडे ; राज्य सरकारकडून प्रक्रिया सुरू

एमएमआरडीए व राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी मेट्रो ३, ४ व ६ साठी एकत्रित कारशेड करण्याचे ठरवले
Mumbai Metro : मेट्रो-६ कारशेडसाठी कांजूरची जागा एमएमआरडीएकडे ; राज्य सरकारकडून प्रक्रिया सुरू

कांजूरमार्गच्या कारशेडवरून मोठे राजकारण झाल्यानंतर आता ती जागा एमएमआरडीएकडे सोपवण्याबाबत राज्य सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. ‘मेट्रो ६’साठी कारशेड उभारण्याचे काम या ठिकाणी केले जाणार आहे.

मेट्रो-६ स्वामी समर्थ नगर (लोखंडवाला) ते कांजूरमार्ग दरम्यान धावणार आहे. या मार्गासाठी कारशेड कांजूरला असेल. गेल्या चार वर्षांपासून कांजूरमार्गच्या जागेच्या मालकी हक्कावरून केंद्र, राज्य सरकार व खासगी कंपन्यांत वाद सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयातही गेले. आता राज्य सरकारने मुंबई उपनगरीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा मोठा भूखंड एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली.

एमएमआरडीए व राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी मेट्रो ३, ४ व ६ साठी एकत्रित कारशेड करण्याचे ठरवले. मेट्रो कारशेड ३ चा कारशेड आरे कॉलनीत उभारण्यास पर्यावरणवाद्यांनी विरोध केला. आता आरे कॉलनीत हे कारशेड उभारणीचे काम सुरू आहे. मेट्रो-४ ची कारशेड मोगरपाडा (ठाणे) येथे असेल.

१५ हेक्टर जागेसाठी ऑर्डर जारी

राज्य सरकारने १५ हेक्टर जागा देण्याची ऑर्डर जारी केली आहे. मात्र, अजूनही ही जागा आम्हाला मिळालेली नाही. हे काम लवकरच पूर्ण होईल, अशी आशा आम्हाला आहे. मेट्रो-६ चे काम वेगाने सुरू आहे, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

डबलडेकर पूल

मेट्रो-६ ही जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावरून जाणार आहे. विशेष म्हणजे येथे डबलडेकर पूल आहे. वर मेट्रो तर खालील बाजूने रस्ते वाहतूक असेल. प. द्रूतगती मार्ग व पूर्व द्रूतगती महामार्गादरम्यान ही वाहतूक सिग्नलमुक्त असेल. ही मेट्रो १५.३१ किमीची असून, तिचे ७० टक्के काम पूर्ण झाले. या मार्गावर १३ स्थानके असतील.

logo
marathi.freepressjournal.in