कन्नमवारनगरचे रहिवासी सांडपाण्याने त्रस्त आरोग्याला धोका; तक्रारीनंतर पर्जन्य जलवाहिन्यात सुधारणा

जनता मार्केट परिसरातील रहिवासी नसीर देशमुख म्हणाले की, “गेल्या काही वर्षांपासून आम्ही या समस्येला तोंड देत आहोत.
कन्नमवारनगरचे रहिवासी सांडपाण्याने त्रस्त आरोग्याला धोका; तक्रारीनंतर पर्जन्य जलवाहिन्यात सुधारणा
Published on

मुंबई : विक्रोळी पूर्व, कन्नमवार नगर येथील रहिवासी मागील काही महिन्यांपासून सांडपाण्याने त्रस्त झाले आहेत. सांडपाणी रस्त्यावर पसरत असल्याने रहिवाशांना चालणे कठीण झाले आहे. परिसरात दुर्गंधीही पसरल्याने रहिवाशांना अक्षरश: नाक मुठीत धरून चालावे लागते आहे. दरम्यान, रहिवाशांच्या पाठपुराव्यानंतर म्हाडाने सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यात सुधारणा केल्याचे सांगण्यात आले.

कन्नमवार नगर वसाहत सन १९६० नंतर विकसित झाली असून येथे तीन ते चार मजल्यांच्या इमारती आहेत. त्यावेळच्या इमारतींच्या संख्येनुसार सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची रचना करण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत या भागात पुनर्विकासात भर पडत असून जुन्या इमारतीच्या जागी बहुमजली टॉवर उभे राहत आहेत. मात्र सांडपाण्याचे जाळे जुने आहे, त्यामुळे ते तुंबत असल्याचे येथील रहिवासी आत्माराम कांबळे यांनी सांगितले. दुर्गानाक्याजवळ ३० ते ४० मीटर अंतरात सांडपाणी पसरून ते पूर्ण रस्त्यापर्यंत येते. कांजूरमार्ग डम्पिंगमुळे रात्री व पहाटे कचऱ्याची दुर्गंधी कायम असते. आता सांडपाण्याच्या दुर्गंधीचा प्रश्न भेडसावत आहे, असे विनायक नाईक म्हणाले.

जनता मार्केट परिसरातील रहिवासी नसीर देशमुख म्हणाले की, “गेल्या काही वर्षांपासून आम्ही या समस्येला तोंड देत आहोत. या परिसरातील नाल्याबद्दलची माहिती पालिकेला दिल्यानंतर नाला साफ करण्यात आला. मात्र दोन ते तीन दिवसांतच पुन्हा सांडपाणी रस्त्यावर वाहू लागले. रहिवासी या समस्येने हैराण झाले आहेत.”

logo
marathi.freepressjournal.in