पाणीपुरवठ्यासाठी कशेळी ते मुलुंड जल बोगदा; पालिका ३५० कोटी रुपये खर्च करणार, महिनाभरात निविदा प्रक्रिया

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालिका या जल बोगद्याचा पाणीपुरवठ्यासाठी वापर करण्यास सुरुवात करणार आहे.
पाणीपुरवठ्यासाठी कशेळी ते मुलुंड जल बोगदा; पालिका ३५० कोटी रुपये खर्च करणार, महिनाभरात निविदा प्रक्रिया

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून, त्या जीर्ण झाल्याने वारंवार पाणी गळतीचा सामना मुंबईला करावा लागतो. पाणी गळती रोखत मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा करता यावा यासाठी कशेळी ते मुलुंडदरम्यान जल बोगदा बांधण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ३५० कोटी रुपये खर्च करणार असून, यासाठी निविदा मागवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यापैकी दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा भातसा धरणातून होतो. भातसा धरणातून मुंबईला पुरवठा होणाऱ्या दोन हजार दशलक्ष लिटर पाण्यापैकी १३६५ दशलक्ष लिटर पाणी पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध केले जाते. त्यानंतर ते जल वाहिनीने मुंबईला उपलब्ध होते; मात्र मुंबई-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आणि सुरक्षित पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून जमिनीवर कार्यान्वित असलेल्या मुख्य जलवाहिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी कशेळी ते मुलुंड दरम्यान अतिरिक्त क्षमतेसह जलबोगदा बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालिका या जल बोगद्याचा पाणीपुरवठ्यासाठी वापर करण्यास सुरुवात करणार आहे. विद्यमान जलवाहिन्यांचे जाळे हे संरक्षित (बॅकअप) म्हणून असेल.

logo
marathi.freepressjournal.in