मेट्रोचे काम बंद पाडणाऱ्या भाजप आमदारास मुख्यमंत्र्यांनी खडसावले; अखेर काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरू

मेट्रोच्या तांत्रिक चाचणीसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर बाब एमएमआरडीए अधिकाऱ्यांसह काहींनी निदर्शनास आणून दिल्यानंतर फडणवीस यांनी आमदाराची कानउघडणी करत नाराजी व्यक्त केली.
मेट्रोचे काम बंद पाडणाऱ्या भाजप आमदारास मुख्यमंत्र्यांनी खडसावले; अखेर काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरू
Published on

भाईंंदर : मीरा-भाईंदर शहराच्या मुख्य सार्वजनिक रस्त्यावर काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुमारे २ वर्षांपासून भाजप आमदार नरेंद्र मेहतांच्या कंपनीने जागेच्या मोबदल्यावरून बंद पाडले होते. मेट्रोच्या तांत्रिक चाचणीसाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सदर बाब एमएमआरडीए अधिकाऱ्यांसह काहींनी निदर्शनास आणून दिल्यानंतर फडणवीस यांनी मेहतांची कानउघडणी करत नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्रीच बोलल्यानंतर गेले दोन वर्ष बंद पाडलेले मेट्रो जिन्याचे काम तात्काळ सुरू झाले आहे.

दहिसर - काशिगाव हा मेट्रोचा पहिला टप्पा आधी सुरू होणार आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज मार्गवरील प्लेझंट पार्क - विनय नगर या ठिकाणी बांधल्या जाणाऱ्या काशिगाव मेट्रो स्थानकाचे एका बाजूचे जिन्याचे काम हे भाजप आ. नरेंद्र मेहतांच्या कंपनीने जागेचा मोबदला हवा म्हणून थांबवले होते. त्याबाबत वर्षभरापूर्वी देखील मेहतांवर मेट्रोचे काम थांबवल्याचे तत्कालीन आमदार गीता जैन आदींनी आरोप केले होते.

नुकतेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील सेव्हन इलेव्हन कंपनीमुळे काशिगाव मेट्रो स्टेशनचे काम रखडून मेट्रो सुरू होण्यास विलंब झाल्याची टीका केली होती. त्यावर मेहतांनी पत्रकार परिषद घेऊन, आपण तर पालिकेला पत्र दिली असून जागा ताब्यात घ्या व शासन धोरणानुसार मोबदला द्या. २९ कोटी मोबदला चेणे येथील जागेसाठी पालिकेने दिला. मग शासन धोरणानुसार आम्हाला पण जागेचा मोबदला रक्कम स्वरूपात द्यावा, हे सतत पत्र देऊन सुद्धा पालिकेने जागा घेतली नाही, असा दावा मेहतांनी केला होता.

दरम्यान बुधवारी काशिगाव - दहिसर मेट्रोच्या तांत्रिक चाचणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आदी आले होते. तेव्हा मेट्रो स्टेशनच्या जिन्याचे काम मेहतांनी बंद पाडल्याची तक्रार मुख्यमंत्री यांच्या कानावर गेली. मुख्यमंत्री यांनी मेहतांची कानउघाडणी करत मेट्रोचे काम तात्काळ सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून बंद पाडलेले मेट्रो जिन्याच्या कामास तात्काळ सुरवात करण्यात आली. एमएमआरडीएच्या आखणीनुसार ठेकेदाराने रस्त्यावर खोदकाम सुरू केले आहे. त्याठिकाणी मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम लवकर पूर्ण करून मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण केले जाईल.

मेट्रो स्थानकाचा जिना जिकडे बांधायचा आहे, तो मुळात पालिकेने ४५ मीटर विकास आराखड्यातील विकसित केलेला सार्वजनिक वापरातील रस्ता आहे. त्यालगत पालिकेचा नाला आहे. मात्र काही वर्षांपूर्वी जागा विकत घेऊन मेहतांनी वापरातील जुना रस्ता व नाल्यावर मेट्रोचे काम रोखून धरणे निंदनीय आणि विकासकाम रोखण्याचा आडमुठेपणा केल्याचा आरोप सातत्याने मेहतांवर केले गेले.

logo
marathi.freepressjournal.in