
कल्याण (Kalyan) रेल्वे स्थानक परिसरामध्ये निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कल्याण डोंबिवली महापालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या परिसरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्टेशन परिसर विकासकामासह उड्डाणपुलाचे काम चालू आहे. तसेच, या परिसरात एसटी डेपो असल्याने एसटी बससह इतर बसेस, रिक्षा आणि टॅक्सींची वर्दळ असते. त्यामुळे इथे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच, पुलाचे काम करण्यासही अडथळा निर्माण होत होता. यावर तोडगा म्हणून पुढील चार महिन्याच्या कालावधीत कल्याण स्टेशन परिसरात शहराबाहेरून येणाऱ्या आणि शहराबाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना या परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकाचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले की, येत्या सोमवारपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच, मुरबाड, शहापूरकडून येणाऱ्या काळ्या पिवळ्या टॅक्सींना देखील या परिसरात प्रवेश बंदी करण्यात आली. प्रवाशांच्या सोयीसाठी या बसेसना गुरुदेव चौकात थांबा दिला आहे. तसेच लांब पल्ल्याच्या एसटी गाड्या, शहराबाहेर जाणाऱ्या केडीएमटी बसेस त्याचप्रमाणे एनएमटीच्या बसेसना पुढील चार महिन्यासाठी दुर्गाडी तसेच गणेश घाट परिसरात थांबा देण्यात आला आहे.