मुंबई : 'स्वच्छता हीच सेवा' हा उपक्रम केवळ छायाचित्र काढण्यासाठी उपक्रम नसून, यातून आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एक जन चळवळ उभी करत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सार्वजनिक स्वच्छतेसाठी सुरू केलेला 'एक तारीख, एक तास' हा उपक्रम म्हणजे सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनविण्यासाठी टाकलेले मोठे पाऊल आहे.
स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानेच राबविण्याचा उपक्रम नाही, तर ती नेहमीसाठी आपली जीवनशैली असली पाहिजे. त्याचप्रमाणे राज्यातील गडकिल्ले, धार्मिक स्थळे, मंदिरे यांच्या परिसरात देखील स्वच्छता असली पाहिजे. ही तीर्थक्षेत्रे सुंदर दिसली पाहिजेत, यासाठी देखील सर्वांनी सहभागी होऊन योगदान द्यावे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईत रविवारी १७८ ठिकाणी जन सहभागातून स्वच्छता श्रमदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठी, हिंदी सृष्टीतील सिने कलाकार, संस्था व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्वराज्यभूमी येथील श्रमदानानंतर एकनाथ शिंदे यांनी बाणगंगा तलाव परिसरात जावून तेथे केलेल्या विकास कामांची पाहणी केली.
'यांचा' सहभाग
स्वराज्यभूमी वरील श्रमदानामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मंगेश कुडाळकर, इस्रायलचे भारतातील वाणिज्यदूत कोब्बी शोशानी, नॉर्वेचे भारतातील वाणिज्यदूत अर्ने जॅन फ्लोलो, तसेच राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव के. एच. गोविंदराज, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, तटरक्षक दलाचे पश्चिम विभागाचे महासंचालक कैलाश नेगी, नौदलाचे व्हाइस एडमिरल दिनेश त्रिपाठी, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, उपायुक्त (परिमंडळ १) संगीता हसनाळे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव तसेच अभिनेते नील नितीन मुकेश, पद्मिनी कोल्हापुरे, सुबोध भावे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, आदी यात सहभागी झाले होते. केंद्र आणि राज्य सरकारचे विविध विभाग, राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी), राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस), वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था - संघटना, खासगी- सहकारी बॅंका, अंगणवाडी कर्मचारी, विविध व्यापारी संघटना तसेच इतर महाविद्यालयीन विद्यार्थी, अनिरुद्ध अकादमी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि इतर स्वयंसेवी संघटना व संस्थांचे स्वयंसेवक यांनी सहभागी होऊन स्वच्छता श्रमदान केले.