
मुंबई : यंदा पावसाचा जोर तितकासा नसला तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे. १८ ते २५ सप्टेंबर या एका आठवड्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पावसाळी आजारांचे टेंशन कायम आहे. मलेरिया व डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस व अँनोफिलीस डासांची १५ हजार ३७६ उत्पत्ती स्थाने आढळून आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. दरम्यान, साथीच्या आजारांचा रुग्णांचा शोध घेत त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यासाठी १ लाख ८ हजार ९९२ लोकांचे ब्लड सॅपल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
जून महिना कोरडा गेला, ऑगस्ट महिना कोरडा गेला मात्र पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. १८ सप्टेंबरपर्यंत मलेरिया - ७५६, डेंग्यू - ७०३, लेप्टो ५०, गॅस्ट्रो ३२२ रुग्ण आढळले होते. परंतु १८ ते २५ सप्टेंबर या एका आठवड्यात रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रो, कावीळ व चिकनगुनिया या साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईत विशेष मोहीम हाती घेतली आहे.
१३ लाख ३३ हजार २५० घरांची झाडाझडती
विशेष मोहिमे अंतर्गत पालिकेने १३ लाख ३३ हजार २५० घरांची झाडाझडती घेतली असून, ६६ लाख ६६ हजार २५० लोकांचे सर्वेक्षण केले. यात १ लाख ८ हजार ९९२ जणांचे रक्ताचे नमुने घेतले असून, तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
- अॅनोफिलीस डासांच्या अळ्यांचा शोध घेण्यासाठी १६ हजार ९५१ घरांची झाडाझडती. यात ४७ हजार २५२ प्रजनन स्त्रोतांचा शोध.
-१,६७८ ठिकाणी अँनोफिलीस डासांच्या उत्पत्ती स्थाने.
- एडिस डासांच्या अळ्यांचा शोध घेण्यासाठी १ लाख ७०८ घरांची झाडाझडती.
-१ लाख ६८ हजार ३६७ कंटेनरची तपासणी. यात १३ हजार ६९८ एडिस डासांच्या उत्पत्ती स्थाने आढळली.
१ ते २५ सप्टेंबर दरम्यान साथीचे आजार
मलेरिया - १,०६९
डेंग्यू - १,०३१
गॅस्ट्रो - ४४०
लेप्टो - ६१
कवीळ - ४८
चिकनगुनिया - २४
स्वाईन फ्लू - १२