मुंबई : पालिकेच्या प्रमुख रुग्णालयापैकी केईएम रुग्णालयातील सेवा निवासस्थानात राहणाऱ्या व सेवानिवृत्त झालेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे देय दावे मागील वर्षभरापासून देण्यास उपप्रमुख लेखापाल टाळाटाळ करत आहेत. याविरोधात अनेकदा आवाज उठवला, तरी रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून केईएम रुग्णालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनने दिला आहे.
कर्मचाऱ्यांना भाडेमुक्त निवास या आदेशांतर्गत निवासस्थान दिले जातात. तसेच त्यांच्या वेतनातून घरभाडे भत्ता कापून घेण्यात येत असताना आता लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी मनमानी व नियमबाह्य पद्धतीने कोणाचीही परवानगी न घेता पूर्वलक्षी प्रभावाने १० टक्के भाडे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जोपर्यंत १० टक्के भाडे वेतनातून कापत नाही, तोपर्यंत सेवानिवृत्ती पश्चात देण्यात येणारे दावे निकाली काढणार नाही, अशी आडमुठी भूमिका घेतली आहे. अनेक वर्षे रुग्णसेवा केलेल्या सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या देय हक्कापासून वंचित ठेवण्यात येत आहे. जाणीवपूर्वक दावे प्रलंबित ठेवल्यामुळे सर्व संवर्गातील कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
वर्षभरापासून वारंवार विनंती करूनही लेखापाल देय दावे निकाली काढण्यास तयार नाहीत. मुंबई महानगरपालिकेने आमची देय रक्कम विनाविलंब द्यावी, या मागणीसाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसमवेत सोमवारी ठिय्या आंदोलन करणार आहेत, अशी माहिती म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.