मुंबई : मुंबईत २६ मे रोजी अचानक आलेल्या मोठ्या पावसातही केईएम रुग्णालय पूर्ण क्षमतेने २४ तास सुरू होते. सखल भाग असल्यानं तळमजल्यावर काहीवेळ पावसाचं पाणी शिरलं होतं, मात्र ते तातडीने पंपाच्या सहाय्यानं उपसण्यात आले. या पाण्याचा रुग्णांवर किंवा त्यांच्या उपचारांवर कुठलाही परिणीम झालेला नाही. तसेच रुग्णालयातील सारी वैद्यकीय यंत्रसामुग्रीही सुस्थितीत होती, असा दावा रूग्णालय प्रशासनाने हायकोर्टात केला.
२६ मे रोजी मुंबईत झालेल्या जोरदार पावसात अनेक सखल भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील चित्र फारच विदारक आणि चिंतेत टाकणारे असल्याचे ॲड. मोहीत खन्ना यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून देत तातडीनं हायकोर्टाच्या सुट्टीकालीन खंडपीठात दाद मागितली होती. न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरसेन यांच्या खंडपीठाने दखल घेत रुग्णालय प्रशासन आणि महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.
सोमवारी सुनावणीच्या वेळी केईएम रुग्णालय प्रशासनाचा खुलासा केला. २६ मे रोजी मुंबईत अचानक आलेल्या मोठ्या पावसातही केईएम रुग्णालय पूर्ण क्षमतेने २४ तास सुरू होते. सखल भाग असल्याने तळमजल्यावर काहीवेळ पावसाचे पाणी शिरले होते, मात्र ते तातडीने पंपाच्या सहाय्याने उपसण्यात आला. या पाण्याचा रुग्णांवर अथवा त्यांच्या उपचारांवर कुठलाही परिणाम झालेला नाही.
तसेच रुग्णालयातील सर्व वैद्यकीय यंत्रसामुग्रीही सुस्थितीत होती. २६ मे रोजी केईएममध्ये १९ एमआरआय, १२० सीटी स्कॅन, आणि २७० एक्स-रे काढले गेल्याचे केईएमच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले.