सीटी स्कॅन मशिन्स बंदचे रॅकेट खुलेआम ; रुग्णांचा खिसा खाली, पालिका रुग्णालयातील रुग्णांना मोठा भुर्दंड

परळच्या केईएम रुग्णालयात दोन सीटी स्कॅन मशीन असून, त्यातील एक वर्षभरापासून नादुरुस्त आहे
सीटी स्कॅन मशिन्स बंदचे रॅकेट खुलेआम ; रुग्णांचा खिसा खाली, पालिका रुग्णालयातील रुग्णांना मोठा भुर्दंड
Published on

पालिका रुग्णालयात मोठ्या आशेने येणाऱ्या रुग्णांना रुग्णालय प्रशासनाच्या कारभाराचा मोठा फटका बसत आहे. पालिका रुग्णालयातील सीटी स्कॅन मशिन्स बंद पडल्याने त्यांना खासगी केंद्रातून सीटी स्कॅन करावे लागत आहे.

१६ जूनला श्वेतासिंह साळवे या बसमधून चढताना पडल्या. त्यांना तत्काळ नायर रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना मेंदूचे सीटी स्कॅन करायला सांगितले. रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन बंद असल्याने डॉक्टरांनी त्यांना खासगी निदान केंद्रावरून ‘सीटी स्कॅन’ करायला सांगितले. सरकारी रुग्णालयाची अवस्था पाहून त्यांनी खासगी रुग्णालयाचा रस्ता पकडला. मोठ्या नायर रुग्णालयात सीटी स्कॅन होत नसेल तर ते रुग्णांवर कसे उपचार करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

विद्यमान प्रतिनिधीने बायल नायर रुग्णालयाला भेट दिली. तेव्हा तेथे सीटी स्कॅन मशीन नसल्याचे व त्याच्या विभागाचे नूतनीकरण सुरू असल्याचे दिसून आले. येथे आलेल्या रुग्णांना दादरच्या खासगी निदान केंद्रात व डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाच्या संबंधित निदान केंद्रावर पाठवले जात होते.

परळच्या केईएम रुग्णालयात दोन सीटी स्कॅन मशीन असून, त्यातील एक वर्षभरापासून नादुरुस्त आहे. तर दुसरी तांत्रिक अडचण आल्याने काम करत नाही. रुग्णांचा भार जास्त झाल्याने हे प्रकार घडत असल्याचा आरोप प्रशासन करत आहे.

रोज सीटी स्कॅनसाठी १०० हून अधिक रुग्ण येतात. त्यामुळे सीटी स्कॅनचा अधिक वापर होतो. त्यामुळे अनेक वेळा तिला रिपेअर करावी लागते. त्यामुळे रुग्णांना खासगी निदान केंद्रावर पाठवावे लागते, असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

पैसे कमवण्यात रस

एका खास सूत्राने सांगितले की, रुग्णालय प्रशासन व सीटी स्कॅन डिपार्टमेंटला रुग्णांच्या त्रासाशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना पैसे कमावण्यात जास्त रस आहे. ते आलेल्या रुग्णांना सरळ खासगी निदान केंद्रावर पाठवून देतात. या रुग्णालयात सर्व कामांसाठी लॉबी तयार झाली आहे. रक्त तपासणी, एमआरआय व सीटी स्कॅन हे रुग्णालयात कमी दरात उपलब्ध आहे. तरीही रुग्णांना बाहेर पाठवले जाते.

मुंबई मनपाने खासगी निदान केंद्रांना सीटी स्कॅनसाठी सरकारी रुग्णालयांप्रमाणे दर आकारणी करावी, असे आदेश दिले आहेत. तरीही डॉक्टर हे खासगी निदान केंद्रावर रुग्णांना पाठवतात. कारण त्यांचे कमिशन ‘फिक्स’ आहे. मनपा रुग्णालयात सीटी स्कॅनसाठी १ ते १२०० रुपये घेतात, तर खासगी निदान केंद्रावर त्यासाठी ३ ते ४ हजार रुपये मोजावे लागतात, असे एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

दुसऱ्या एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या रुग्णालयात रुग्णांना ॲॅडमिट करणे हे धोक्याचे आहे. कारण केईएम, सायन रुग्णालयात रुग्णवाहिकेने गंभीर रुग्णाला सीटी स्कॅनला नेणे धोकादायक आहे. कारण रस्त्यात रुग्णाला काय झाले तर सर्व जबाबदारी डॉक्टरवर येऊ शकते. रुग्णाच्या नातेवाईकांच्या रोषाला डॉक्टरला बळी पडावे लागते. तसेच रुग्णाला निदान केंद्रावर नेऊन पुन्हा रुग्णालयात आणणे धोकादायक आहे, असे त्याने सांगितले.

सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले की, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आम्ही आणखी एक सीटी स्कॅन मशीन बसवणार आहोत. आमच्याकडे एक मशीन सुरू असून, इमर्जन्सी रुग्णाला तेथे प्रवेश दिला जातो.

दरम्यान, सायन रुग्णालयात पूर्वी १५० सीटी स्कॅन दर दिवशी केले जात होते. आता हाच आकडा ८० वर आला आहे. सर्व रुग्णालयावरील सीटी स्कॅनचा लोड पाहता नियमित सीटी स्कॅन करायला आम्ही धारावीतील सार्वजनिक-खासगी केंद्राकडे किंवा गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवतो. केवळ इमर्जन्सी रुग्णांना किंवा अन्य सरकारी रुग्णालयातून आलेल्या रुग्णांचे सीटी स्कॅन केले जाते, असे ते म्हणाले.

तरतूद कागदावरच यंदा मुंबई मनपाने केईएम, नायर व सायन रुग्णालयात

नवीन एमआरआय मशीन, सीटी स्कॅन मशीनसाठी १२० कोटींची तरतूद केली आहे. तरीही या रुग्णालयांकडे या सेवांचा पूर्ण अभाव आहे. अनेक तक्रारी येऊनही रुग्णालय प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in