

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला निवासी डॉक्टरांची संघटना 'केईएम मार्ड'ने तीव्र विरोध केला आहे. हा निर्णय अत्यंत निराशाजनक आणि अमान्य असल्याचे संघटनेने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, रुग्णालयाचे नाव बदलण्याऐवजी आधी रुग्णालयापुढील मुख्य समस्या सोडवा, अशी मागणी 'मार्ड' ने केली आहे.
परळमधील केईएम रुग्णालय हे गेल्या अनेक दशकांपासून सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण आणि रुग्णसेवेचे उत्कृष्ट प्रतीक आहे. या संस्थेची ओळख डॉक्टर, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, कर्मचारी आणि रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशा नामांकित संस्थेचे नाव बदलण्यापूर्वी निवासी डॉक्टरांसारख्या महत्त्वाच्या घटकांशी चर्चा करणे आवश्यक होते, असेही संघटनेने नमूद केले.
'केईएम' रुग्णालय ही केवळ एक वास्तू नसून तो एक वारसा आहे, ज्याचे शैक्षणिक, वैद्यकीय आणि सार्वजनिक महत्त्व मोठे असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
रुग्णसेवा, डॉक्टरांसाठी ठोस सुधारणा करा !
'बृहन्मुंबई महानगरपालिका' नागरी आरोग्य समितीने शुक्रवारी केईएम रुग्णालयाचे नाव बदलून 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल' (केईएम) रुग्णालय असा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव आता प्रशासकीय मंजुरीसाठी पालिका आयुक्तांकडे आणि त्यानंतर महापालिकेच्या महासभेकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. प्रशासनाने नामांतराचा हा प्रस्ताव फेटाळून लावावा आणि त्याऐवजी रुग्णसेवा व डॉक्टरांच्या कल्याणासाठी ठोस सुधारणांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी 'मार्ड'ने केली आहे.
...तर नवीन रुग्णालय उभारा !
रुग्णालयात सध्या वसतिगृहांची अपुरी सुविधा, लिफ्ट वारंवार बंद पडणे आणि विद्यावेतन वेळेवर न मिळणे यांसारखे अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत. अशा वेळी प्रशासनाने केवळ प्रतीकात्मक बदलांवर लक्ष केंद्रित न करता आरोग्य व्यवस्था बळकट करणे आणि कामकाजाच्या स्थितीत सुधारणा करणे गरजेचे आहे. प्रशासनाला नवीन ओळख निर्माण करायची असल्यास, त्यांनी आधुनिक पायाभूत सुविधा असलेले नवीन रुग्णालय उभारावे, अशी सूचनाही निवासी डॉक्टरांनी केली आहे.