Mumbai : क्रीडापटूंवर एकाच छत्राखाली उपचाराची सुविधा; पर‌ळच्या केईएम रुग्णालयात स्वतंत्र क्रीडा वैद्यकीय विभाग

क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी केईएम रुग्णालयमधील केंद्राच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धती आणि पुनर्वसन सेवा उपलब्ध होणार आहेत. अशा स्वरूपातील सुविधा उपलब्ध करून देणारे सरकारी रुग्णालयांमधील केईएम हे मुंबईतील पहिले रुग्णालय ठरले आहे.
क्रीडापटूंवर एकाच छत्राखाली उपचाराची सुविधा; पर‌ळच्या KEM रुग्णालयात स्वतंत्र क्रीडा वैद्यकीय विभाग
क्रीडापटूंवर एकाच छत्राखाली उपचाराची सुविधा; पर‌ळच्या KEM रुग्णालयात स्वतंत्र क्रीडा वैद्यकीय विभाग
Published on

मुंबई : क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी केईएम रुग्णालयमधील केंद्राच्या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धती आणि पुनर्वसन सेवा उपलब्ध होणार आहेत. अशा स्वरूपातील सुविधा उपलब्ध करून देणारे सरकारी रुग्णालयांमधील केईएम हे मुंबईतील पहिले रुग्णालय ठरले आहे. क्रीडा क्षेत्राला उत्तमोत्तम उपलब्ध करून देण्यासाठी या केंद्राचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे गौरवोद्गार मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. केईएम रुग्णालयात क्रीडा वैद्यकीय विभाग हा एक स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण क्षमतेने या ठिकाणी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

परळ येथील राजे एडवर्ड स्मारक (केईएम) रुग्णालय येथे क्रीडा क्षेत्रातील दुखापतग्रस्त खेळाडूंसाठी उपचार आणि पुनर्वसन केंद्राचे लोकार्पण मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. क्रीडा क्षेत्रासाठी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित केंद्राची निर्मिती केल्याबद्दल आयुक्तांनी केईएम रुग्णालयाच्या क्रीडा वैद्यकीय विभागाच्या चमूचे कौतुक केले. क्रीडा क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धतीची निर्मिती करण्यासाठी आर्थिक सहाय्य केल्याबद्दल बालकृष्ण इंडस्ट्रीचेदेखील गगराणी यांनी आभार मानले.

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून क्रीडापटूंसाठी या स्वरूपाचे योगदान म्हणजे खासगी क्षेत्राची क्रीडा क्षेत्रासाठी असणारी वचनबद्धता आहे. बालकृष्ण इंडस्ट्रीने क्रीडा क्षेत्रासाठी योगदान करण्याची तयारी ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. ज्याचा फायदा हा केईएम रुग्णालयाची देशपातळीवरील क्रमवारी उंचावण्यासाठी निश्चितच होईल, असे आयुक्त म्हणाले. यावेळी उपायुक्त शरद उघडे, केईएम अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, डॉ. मोहन देसाई, बाळकृष्ण इंडस्ट्रीच्या विजयालक्ष्मी पोद्दार, अरविंद पोद्दार आदी उपस्थित होते.

एकाच छताखाली मिळणार हे उपचार!

क्रीडापटूंच्या उपचारासाठी आवश्यक असणारे आर्थोस्कोपी शल्यचिकित्सक, फिजिओथेरपिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, बायोफिजिसिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ अशा स्वरूपाचे सर्व उपचार एकाच छत्राखाली उपलब्ध असणार आहेत.

उपचार व पुनर्वसन केंद्राच्या ठिकाणी सुविधा

  • अंडरवॉटर ट्रेडमिल

  • डी वॉल आणि वॉकर व्ह्यूव्ह मशीन

  • झिरो ग्रॅव्हिटी ट्रेडमिल

  • एरोलॅप आणि डायनेलॅब

२० बेड्सचा विशेष कक्ष

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरोग्य सुरक्षेची सुविधा उपलब्ध असणाऱ्या या केंद्राच्या ठिकाणी सर्व वयोगटाच्या रुग्णांसाठी उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यासाठी २० रुग्णशय्या असणारा विशेष कक्षदेखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच क्रीडापटूंना आवश्यक असणाऱ्या टेकार थेरपी, अल्ट्रासोनिक थेरपी, इंटरफेरेन्शिअल थेरपी, शॉकवेेव्ह थेरपी, आईस ॲण्ड हिट थेरपी आदी उपचार पद्धतीदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in