

मुंबई : स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या लाईव्ह शोमध्ये केईएम रुग्णालयातील वैद्यकीय शिक्षणाची विद्यार्थिनी सेजल पवार हिने केलेल्या कथित आक्षेपार्ह आणि घृणास्पद वक्तव्याप्रकरणी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत अशा प्रकारांना कोणतीही माफी नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, डॉ. सेजल पवार यांना निलंबित करण्यात आल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी सांगितले.
मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता, बीभत्सता आणि समाजात चुकीचा संदेश देणारी वक्तव्ये खपवून घेतली जाणार नसून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश रुग्णालय प्रशासनाला दिल्याचे महापौरांनी सांगितले.
या प्रकरणी केईएम रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली असून सायबर विभागानेही गुन्हा दाखल करून कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दोन क्लिप्समधील आशयामुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका क्लिपमध्ये महिलेविषयी आक्षेपार्ह वर्तनाचे समर्थन केल्याचा आरोप असून दुसऱ्या क्लिपमध्ये देहदान केलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांबाबत केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.
चौकशीसाठी द्विसदस्यीय समिती स्थापन
केईएम रुग्णालयाने सेजल पवार हिच्याविरुद्ध चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या शो दरम्यान सेजलने पुरुषांच्या मृतदेहांविषयी वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांनी स्पष्ट केले की, समिती पुढील दोन दिवसांत अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, सेजलवर वैयक्तिक चिखलफेक करू नये, असे आवाहन ‘मार्ड’ने केले आहे.
सोशल मीडियावर केईएम रुग्णालयाच्या एका विद्यार्थिनीचा व्हिडिओ वेगाने पसरत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. यामध्ये ती पुरुषांच्या मृतदेहांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी जेव्हा कोणी आपले शरीर अत्यंत भावूक मनाने दान करते, तेव्हा त्या मृतदेहाचा आदर राखण्याबाबत आम्ही अत्यंत संवेदनशील असतो. एनएमसीच्या सोशल मीडिया मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे का, हे तपासले जात असून अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
हरीश पाठक, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय