
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी कोठडीत असलेल्या अभिनेत्री केतकी चितळेने गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केतळीवर राज्यभरात अनेक गुन्हे दाखल आहेत. ‘माझ्यावर झालेली अटकेची कारवाई बेकायदा आहे,’ असे सांगत गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशा मागणीचा अर्ज केतकीने न्यायालयात केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयीची आक्षेपार्ह कविता सोशल मीडियावर पोस्ट केल्याबद्दल कळवा पोलीस ठाण्यासह राज्यभरातील अनेक पोलीस ठाण्यांत केतकीविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. तिला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. गेल्या २३ दिवसांपासून ती कोठडीत आहे. हे सर्व गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी केतकीने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ‘‘अनेक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारींच्या आधारे दाखल करून घेतलेले सर्व एफआयआर बेकायदा आहेत आणि माझ्यावर झालेली अटकेची कारवाईही बेकायदा आहे,’’ असे केतकीने आपल्या अर्जात म्हटले आहे. या अर्जावर लवकरात लवकर सुनावणी होण्यासाठी वकील घनश्याम उपाध्याय कोर्टाला विनंती अर्जही करणार आहेत.