मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांचे संकेत :

आधीच्यांना अद्याप खातेवाटप नाही
File Photo
File PhotoANI

मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलैपासून मुंबईत सुरू होणार आहे. राज्यात रोजच नाट्यमय राजकीय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आता आठवडा उलटला आहे. मात्र, त्यांना तसेच त्यांच्यासोबत शपथ घेतलेल्या ८ जणांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. त्यातच शिवसेना आणि भाजपमधील अनेक जण मंत्रिपदाच्या शपथेसाठी उत्सुक आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील तसे संकेत दिले आहेत.
अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल टाकत राष्ट्रवादीत बंडाचा झेंडा उभारला. पक्षातील दिग्गज नेते तसेच ४० आमदारांना सोबत घेत ते सरकारमध्ये सहभागी झाले. २ जुलै रोजी त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. सोबतच आठ आमदारांचाही शपथविधी झाला, पण अद्याप आठवडा उलटला तरी त्यांचे खातेवाटप जाहीर झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनेक नेतेमंडळी मंत्रिपदासाठी गेले वर्षभर उत्सुक आहेत. त्यांच्यात यामुळे नाराजी निर्माण झाली नसती तरच नवल. पक्षाच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. नंतर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन नाराजी दूर करण्याचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. दरम्यानच्या काळात भाजपच्याच काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू देऊन नवीन लोकांसाठी जागा तयार करण्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी त्या फेटाळल्या आहेत. पक्षाचा विस्तार करताना पक्षातीलच नेत्यांना नाराज करून कसे चालेल, असा त्यांचा सवाल आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसेच इतरही काही मंत्र्यांकडे मोठ्या प्रमाणात खाती आहेत, ती नवीन मंत्र्यांना देता येऊ शकतात.

झालेल्या बैठकीत सगळ्यांचे समाधान होईल, असा फॉर्म्युला तयार करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मंत्रिपदे न मिळाल्याने नाराज झालेल्या काही आमदारांना महत्त्वाची महामंडळे देखील देण्यात येणार आहेत. आता येत्या १७ जुलैपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. ४ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन चालेल. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार करायचा झाल्यास तो येत्या दोन दिवसांतच करावा लागणार आहे. कारण मंत्रिपद मिळाल्यानंतर खाते देखील मिळते. अधिवेशनात या खात्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. त्यामुळे मंत्र्यांना खात्याचे ब्रिफिंग घेण्यासाठी किमान चार ते पाच दिवसांचा अवधी तरी हाती असायला हवा. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार देखील येत्या दोन-तीन दिवसांत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील विस्तार केंद्राच्या आधी होणार की नंतर, हे लवकरच दिसणार आहे.

खातेवाटपात कस लागणार
अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस आपल्याकडचे अर्थखाते देतात की राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडील महसूल खाते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अजितदादांना अर्थखाते देण्याबाबत शिंदे गटाची भूमिका काय असणार, हे स्पष्ट आहे. कारण शिवसेनेत बंड करताना सगळ्यांनी आघाडी सरकारच्या काळात अर्थखाते सांभाळणाऱ्या अजितदादांना देखील निधीवाटपात भेदभाव केल्याचा दोष दिला होता. त्यामुळे खातेवाटप करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कस लागणार आहे

logo
marathi.freepressjournal.in