
मुंबई : अपहरण केलेल्या २२ वर्षांच्या तरुणीवर तिच्याच मित्राने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हा दाखल होताच मुख्य आरोपीसह त्याच्या मित्राला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. योगेश ऊर्फ रोझारिओ अन्थोनी जोसेफ आणि फैजल सलीम अन्सारी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
पिडीत तरुणी ही मालवणी परिसरात राहत सतत असून, मोबाईलवर व्हिडीओ पाहत असल्याने तिचे तिच्या आईसोबत भांडण झाले होते. या भांडणानंतर २५ सप्टेंबरला ती घरातून निघून गेली होती. त्यानंतर ती तिचा मित्र फैजलला भेटली. दोन दिवस ती त्याच्यासोबत होती. त्यानंतर त्याने तिला भाईंदर-वसई येथे आणले होते. मित्राच्या घरी आणल्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नको, अशी धमकी दिली होती. याकामी फैजलला योगेश ऊर्फ रोझारिओ याने मदत केली होती. ३० सप्टेंबरला ती घरी आल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिची विचारपूस केली होती. यावेळी तिने घडलेला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तिच्यासोबत मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना हा प्रकार सांगून योगेश आणि फैजलविरुद्ध तक्रार केली होती. या तरुणीच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपीविरुद्ध अपहरणासह लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.