
मुंबई : अंधेरीतील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्या अटकेसाठी सहा जणांच्या एका टोळीने सुमारे ५० लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यांत त्याच्यासह त्याच्या आईला अटकेची धमकी देऊन या टोळीने त्यांच्या मोबाईलसह सुमारे सव्वापाच लाखांची खंडणी वसुली केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच या कटातील मुख्य आरोपी दीपक विलास जाधव याला गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.
अंधेरीत राहणारे तक्रारदार व्यापारी ३० जून रोजी एका मैत्रिणीसोबत थेरपी बार अँड रेस्ट्रॉरंटमध्ये आले असताना सहा जणांच्या एका टोळीने त्यांचे अपहारण केले. आपण घाटकोपर अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करून तुम्ही ड्रग्ज तस्करी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तक्रादाराचा मोबाईल घेऊन त्यांनी जीपेद्वारे ५ लाख ३० हजार रुपये वसूल केले. तसेच त्यांच्याकडे ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही रक्कम दिली नाहीतर त्यांचे आयुष्य बर्बाद करू तसेच आईलाही खोट्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी दिली.
घडलेला प्रकार दोन दिवसांनी त्यांनी वडिलांसह मैत्रिणीला सांगितला. त्यानंतर त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित सहा आरोपीविरुद्ध मारहाण करणे, अपहरणासह खंडणीसाठी धमकी देणे, शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणे आदी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी या कटातील मुख्य आरोपी दीपक जाधव याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यानेच कट रचून त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याला या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.