मुंबई : प्रॉपटीच्या वादातून एका ७४ वर्षांच्या वयोवृद्धाच्या अपहारप्रकरणी ललित रोहित पाटील याला समतानगर पोलिसांनी अटक केली. या वयोवृद्धाची धुळ्यातून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या गुन्ह्यांत इतर दोन ते तीन आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. ३२ वर्षांची तक्रारदार महिला ही मिरारोड येथे राहत असून, तिचे वयोवृद्ध वडिल कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहतात. ९ ऑगस्टला काही अज्ञात व्यक्तीने तिच्या वडिलांचे त्यांच्या राहत्या घरातून अपहरण केले होते. हा प्रकार सोसायटीच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता. राहत्या घरातून वडिल अचानक बेपत्ता झाल्याने दुबईतील मुलीने चौकशी सुरू केली होती. या चौकशीदरम्यान तिच्या वडिलांचे अपहरण झाल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने मिरारोड येथे राहणाऱ्या बहिणीला फोनवरुन पोलिसांत तक्रार करण्यास सांगितले होते. त्यानंतर या महिलेने तिच्या वडिलांच्या अपहरणाची तक्रार समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या वयोवृद्धाचा चालक ललित पाटील याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्यासह त्याच्या इतर सहकाऱ्यांनी या वयोवृद्धाचे अपहरण केल्याची कबुली दिली. अपहरणानंतर त्यांना धुळे येथे ठेवण्यात आले होते. प्रॉपटीच्या वादातून त्यांच्या नातेवाईकांनीच त्यांचे अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले.