अभिषेक घोसाळकरांची हत्या हा पूर्वनियोजित कट; मॉरिसच्या बॉडीगार्डला अटक

सहा महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने अभिषेक यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याचा, त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता
अभिषेक घोसाळकरांची हत्या हा पूर्वनियोजित कट; मॉरिसच्या बॉडीगार्डला अटक

मुंबई : माजी नगरसेवक अभिषेक विनोद घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपी मॉरिस नोरोन्हा याचा बॉडीगार्ड अमेंद्रर मिश्रा याला शुक्रवारी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अभिषेक यांच्या हत्येसाठी मॉरिसने अमेंद्ररच्या पिस्तूलचा वापर केल्याचे तपासात उघडकीस आल्यानंतर ही कारवाई केली आहे. दरम्यान, या प्रकरणी मेहुल पारेख याची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे बोलले जाते.

लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना मॉरिसने अभिषेक यांच्या हत्येचा कट आखला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने अभिषेकची हत्या करून आपण स्वत:लाही संपविणार असल्याचे पत्नीला सांगितले होते. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

या गुन्ह्यात वापरलेली ही पिस्तूल पोलिसांनी जप्त केली आहे. ती अमेंद्रर मिश्रा याच्या मालकीची आहे. अमेंदर हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो मॉरिसकडे बॉडीगार्ड म्हणून कामाला होता. त्याने फुलपूरमधून पिस्तूलचे लायसन्स काढले होते. २०२६ साली त्याची मुदत संपणार होती. अनेकदा मॉरिस हा अमेंद्ररकडून पिस्तूल घेत होता. पिस्तूल कशा प्रकारे हाताळायचे याचे प्रशिक्षण त्याने घेतले होते. मॉरिसचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध होते. एका महिलेसोबत तो ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहत होता. त्याने विविध कारणे सांगून तिच्याकडून ८५ लाख रुपये घेतले होते. तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले होते. मॉरिसकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या महिलेने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच त्याच्याविरुद्ध फसवणुकीसह लैगिंक अत्याचार व अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवला होता.

त्याने अनेकांना दुप्पट रक्कमेचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली होती. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर संबंधितांनी अभिषेक घोसाळकर यांची मदत घेतली होती. लोकांकडून पैसे उकळून मॉरिसला कायमचे विदेशात जायचे होते. मात्र त्याचा हा प्रयत्नही अभिषेक घोसाळकर यांच्यामुळे फसला होता. त्यातच बलात्कारी महिलेसह इतर लोकांना अभिषेक घोसाळकर हेच भडकवत असल्याचा संशय त्याला होता. जामिन मिळून तो तुरुंगाबाहेर येऊ नये, यासाठी अभिषेकने पोलिसांच्या मदतीने बरेच प्रयत्न केल्याचे मॉरिसला वाटत होते. त्यामुळे तुरुंगात असताना त्याने अभिषेक घोसाळकर यांचा कायमचा काटा काढायचे ठरविले होते.

सहा महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने अभिषेक यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याचा, त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी त्याच्याशी पुन्हा मैत्री केली होती. मॉरिसमध्ये सुधारणा होत असल्याने त्यांनी मॉरिसला वॉर्ड क्रमांक आठमधून शिवसेनेकडून मनपा निवडणुकीचे तिकीट मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. दुसरीकडे अभिषेक घोसाळकर यांच्याबरोबर नेहमीच कार्यकर्त्यांची गर्दी असायची. त्यामुळे या गर्दीत त्यांच्यावर हल्ला करणे शक्य नव्हते. त्यामुळे मॉरिसने गुरुवारी त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांच्यात कटुता मिटविण्याचा प्रयत्न करुन त्यांच्यावर गोळीबार केला होता.

घोसाळकर यांच्या हत्येसह मॉरिसच्या आत्महत्येच्या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन त्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविला होता. कांदिवली आणि दहिसर युनिटच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे गुन्ह्यांचा तपास सुरु केला आहे. गुन्ह्यातील पिस्तूल अमेंद्रर मिश्राचे असल्याचे उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला शनिवारी किल्ला कोर्टात हजर केले जाणार आहे. अमेंदरला मॉरिस आणि अभिषेक यांच्यातील वादाची माहिती होती. मात्र हा वाद इतक्या टोकाला जाईल असे त्याला वाटले नव्हते, असे त्याने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in