

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची मुंबई महापालिकेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांची कोकण आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली.
मुंबई महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर महापौर कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुरुवारी महापौरपदाच्या आरक्षण सोडतीनंतरच याबाबतच्या हालचाली खऱ्या अर्थाने सुरू होणार आहेत. मात्र, त्याआधी मुंबई महापालिकेत पक्षाच्या गटनेतेपदाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पक्षाने गटनेतेपदी नियुक्त केल्यानंतर नियमानुसार सर्व नगरसेवकांसह कोकण भवन येथे अधिकृत नोंदणी करावी लागते. काँग्रेसने अशरफ आझमी यांची गटनेतेपदी नियुक्ती केल्यानंतर मंगळवारी त्यांच्या सर्व नगरसेवकांनी कोकण भवन येथे नोंदणी करण्यात आली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर महापालिकेच्या चिटणीस विभागात नोंदणी केल्याचे पत्र सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत देण्यात आले. बुधवारी शिवसेना (ठाकरे) पक्षानेही माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची गटनेतेपदी निवड केल्याची घोषणा केली.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १९९ मधून किशोरी पेडणेकर विजयी झाल्या होत्या. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रुपल कुसळे यांचा पराभव केला होता. गटनेतेपदी शिवसेना ठाकरेंच्या पक्षाकडून महापालिकेत विविध पदे भूषवलेल्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, मिलिंद वैद्य, श्रद्धा जाधव यांची नावे पुन्हा चर्चेत होती. मात्र, शिवसेना भवनात पार पडलेल्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
महायुतीला रोखण्यासाठी आक्रमक नेतृत्वाला संधी
शिंदे आणि भाजपच्या महायुतीला सभागृहात रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी किशोरी पेडणेकर यांच्यासारख्या आक्रमक आणि अनुभवी नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. महापौर म्हणून पेडणेकर यांनी कोरोना काळात केलेले काम आणि विरोधकांना दिलेली चोख प्रत्युत्तरे यामुळे त्या राज्यभर चर्चेत राहिल्या आहेत. आता मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे संख्याबळ वाढलेले असताना, सभागृहात शिवसेनेची बाजू खंबीरपणे मांडण्यासाठी पेडणेकर यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.