
मुंबई : कथित जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहारप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना सत्र न्यायालयाने मंगळवारी मोठा झटका दिला. सत्र न्यायाधीश एस. बी. जोशी यांनी पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार आहे.
कोरोना महामारीत बॉडी बॅगची चढ्या दराने खरेदी केली. त्या माध्यमातून वैयक्तिक आर्थिक लाभ मिळवल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांच्यासह काही पालिका अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तथापि, या प्रकरणात आपल्याला नाहक गोवण्यात आले आहे, असा दावा करत पेडणेकर यांनी अॅड. राहुल अरोटे यांच्यामार्फत अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला होता. या अर्जावर सत्र न्यायाधीश एस. बी. जोशी यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने पाच दिवसांपूर्वी राखून ठेवलेला निर्णय जाहीर करताना अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावला.
सोमय्या सराईत तक्रारदार
माझ्याविरोधातील तक्रारीमागे राजकीय उलथापालथ कारणीभूत असल्याचे स्पष्ट होते. कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतरच माझ्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रार करणारे किरीट सोमय्या हे भाजपचे नेते आहेत. ते सराईत तक्रारदार आहेत. त्यांचा विरोधी पक्षांतील राजकारण्यांना टार्गेट करण्याचा इतिहास आहे, असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.