प्रेमभंग झाल्याने भररस्त्यात प्रेयसीवर चाकूहल्ला; प्रियकराची आत्महत्या; काळाचौकी येथील घटना

आंबेवाडी येथील आरोपी सोनू बरई याचे मनिषा यादवसोबत प्रेमसंबंध होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध तुटले, तेव्हापासून सोनू मानसिक तणावाखाली होता. बेरोजगार असलेल्या सोनूला तिचे दुसऱ्या सोबत संबंध असल्याचा संशय होता. काही दिवसांपासून तो प्रेमसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची विनवणी करत होता, मात्र तिने नकार दिला.
प्रेमभंग झाल्याने भररस्त्यात प्रेयसीवर चाकूहल्ला; प्रियकराची आत्महत्या; काळाचौकी येथील घटना
प्रेमभंग झाल्याने भररस्त्यात प्रेयसीवर चाकूहल्ला; प्रियकराची आत्महत्या; काळाचौकी येथील घटना
Published on

मुंबई : प्रेमभंग (ब्रेकअप) झाल्याने संतापलेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने हल्ला करून वार केले व नंतर स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लालबाग, काळाचौकी परिसरात घडली. या घटनेत गंभीररीत्या जखमी झालेल्या युवतीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेवाडी येथे राहणारा आरोपी सोनू बरई (२४) याचे मनिषा यादव (२४) या तरुणीसोबत बऱ्याच काळापासून प्रेमसंबंध होते. मात्र, दोन आठवड्यांपूर्वीच त्यांचे प्रेमसंबंध तुटले. तेव्हापासून आरोपी सोनू बरई मानसिकदृष्ट्या तणावाखाली होता. बेरोजगार असलेल्या सोनूला तिचे दुसऱ्या कुणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. तो पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याची विनवणी काही दिवसांपासून करीत होता. मात्र तिने त्यास नकार दिला.

शुक्रवारी आरोपी सोनू बरईने प्रेयसी मनिषा यादवला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दत्ताराम लाड मार्गावर भेटायला बोलावले, तेव्हा त्यांच्यात जोरदार वाद झाला. संतापलेल्या सोनूने तिला भररस्त्यात बेदम मारहाण करत तिच्यावर चाकूहल्ला केला. स्वत:चा बचाव करण्यासाठी मनिषा धावत जवळच असलेल्या एका नर्सिंग होममध्ये शिरली. तिच्यामागून आरोपी सोनूही नर्सिंग होममध्ये शिरला व त्याने तिच्यावर चाकूने बेछूट वार केले. नर्सिंग होमधील कर्मचाऱ्यांनी आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपीने स्वत:चाच गळा चिरून आत्महत्या केली.

दोघांचाही रक्तस्त्रावाने मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. तेथे आरोपी सोनू बरई याचा दाखल करण्यापूर्वीच प्रचंड रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले, तर गंभीररीत्या जखमी झालेल्या मनिषा यादवचा भायखळ्यातील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी काळाचौकी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in