Mumbai : तरुण महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग फोफावतोय; कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील नोंदींचे विश्लेषण

स्तनाचा कर्करोग हा प्रामुख्याने वयस्कर महिलांमध्ये आढळणारा आजार असल्याचा समज आहे.
Mumbai : तरुण महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग फोफावतोय; कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील नोंदींचे विश्लेषण
Mumbai : तरुण महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग फोफावतोय; कोकिलाबेन अंबानी रुग्णालयातील नोंदींचे विश्लेषणसंग्रहित छायाचित्र
Published on: 

मुंबई : स्तनाचा कर्करोग हा प्रामुख्याने वयस्कर महिलांमध्ये आढळणारा आजार असल्याचा समज आहे. मात्र, रुग्णालयातील आकडेवारीवरून या आजाराबाबत सर्व वयोगटांतील महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात २०२५ मध्ये करण्यात आलेल्या सलग ७५३ स्तनशस्त्रक्रियांच्या नोंदींच्या विश्लेषणानुसार, रुग्णांचे सरासरी वय ५२.८ वर्षे होते. असे असले तरी, यापैकी ३०६ नोंदी म्हणजेच सुमारे ४१ टक्के महिला ५० वर्षांखालील होत्या, तर १०३ महिला ४० वर्षांखालील होत्या.

स्तन कर्करोग जनजागृती महिन्याच्या निमित्ताने महिलांनी स्तनांमध्ये नवीन गाठ जाणवणे, स्तनाग्रांमध्ये बदल होणे किंवा त्वचेवर खळगा पडल्यासारखे दिसणे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन केले. कोणतीही लक्षणे आढळल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास उपचारांचे परिणाम अधिक चांगले मिळण्याची शक्यता असते. तसेच उपचारांचे विविध पर्यायही उपलब्ध होऊ शकतात.

रुग्णालयातील शस्त्रक्रियांच्या नोंदींमधून उपचारांच्या पर्यायांचीही माहिती समोर आली आहे. २०२५ मधील एकूण ७५३ नोंदींपैकी ६५४ नोंदींमध्ये स्तन जतन करणाऱ्या शस्त्रक्रियेचा उल्लेख होता. हे प्रमाण जवळपास ८७ टक्के आहे. प्रत्येक महिलेसाठी कोणता उपचार योग्य ठरेल, हे तिच्या वैयक्तिक जोखमीचे मूल्यमापन, वैद्यकीय स्थिती आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवले जाते.

वेळेत वैद्यकीय तपासणी आवश्यक

रुग्णालयातील स्तन कर्करोग उपचार विभागाचे समूह संचालक डॉ. मंदार नाडकर्णी म्हणाले, “स्तनाच्या कर्करोगाबाबतची जनजागृती सर्व वयोगटांतील महिलांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. जनजागृती, वेळेवर वैद्यकीय तपासणी आणि डॉक्टरांशी योग्य माहितीच्या आधारे संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)