कामराला हायकोर्टाचा दिलासा; अटकेपासून संरक्षण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह गाणे सादर केल्याबद्दल वादाच्या भोवर्यात सापडलेला स्टॅन्ड अप कॉमेडियन कुणाल कामराला शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला.
कामराला हायकोर्टाचा दिलासा; अटकेपासून संरक्षण
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह गाणे सादर केल्याबद्दल वादाच्या भोवर्यात सापडलेला स्टॅन्ड अप कॉमेडियन कुणाल कामराला शुक्रवारी उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने कामराला अटकेपासून संरक्षण दिले. मुंबई पोलीस चेन्नईत जाऊन तेथील पोलिसांची मदत घेऊन कामराचा जबाब नोंदवू शकतात, असे खंडपीठाने स्पष्ट केले. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह गीत गायल्यामुळे वादाला तोंड फुटले. त्या गीतानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले. आमदार मुरजी पटेल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याआधारे कुणालविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अटकेच्या भीतीने कुणालने मद्रास उच्च न्यायालयाकडून ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून घेतला होता. त्या जामिनाची मुदत संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द करण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका दाखल केली आहे.

चौकशीला स्थगिती देण्यास नकार

याचिकेवर शुक्रवारी न्या. सारंग कोतवाल आणि न्या. श्रीराम मोडक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने कामराविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीला स्थगिती देण्यास नकार दिला. मात्र याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक करू नये, पोलिसांना आवश्यकता वाटल्यास ते चेन्नईत जाऊन कामराची चौकशी करू शकतात, असे खंडपीठाने कामराला अटकेपासून दिलासा देताना स्पष्ट केले. तसेच कामराची याचिका प्रलंबित असताना मुंबई पोलिसांनी जर त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले तर ट्रायल कोर्ट कामराविरुद्ध कारवाई करणार नाही, असेही खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट करताना कामराच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब केली.

logo
marathi.freepressjournal.in